मुंबई नगरी टीम
मुंबई । आपल्या विविध मागण्यांसाठी दिवाळीपासून संपावर गेलेल्या एसटी कर्मचा-यांच्या संपावर तोडगा निघण्याची चिन्हे आहेत.आज सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत समितीचा निर्णय येई पर्यंत अंतरिम वाढ देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. यावर पुन्हा उद्या सकाळी ११ वाजता एसटी कर्मचारी संघटना आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्यात महत्वपूर्ण बैठक होणार असल्याने गेली अनेक दिवस सुरू असणारा एसटी कर्मचा-यांचा संप मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वेतन वाढीसह,एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचारी दिवाळीपासून संपावर गेले आहेत.या विरोधात एसटी प्रशासनाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने संप करण्यास प्रतिबंध केला होता. त्यानंतर झालेल्या सुनावनीत उच्च न्यायालयाने कर्मचा-यांच्या मागणीचा विचार करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठित करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार राज्य सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समितीची स्थापना केली.ही समिती सर्व २८ कामगार संघटना तसेच महामंडळाचे कर्मचारी यांचे म्हणणे ऐकून घेवून त्यांनी मांडलेले मुद्दे, अभिप्राय नमूद असलेला अहवाल ही मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहे.१२ आठवड्यात ही कार्यवाही पूर्ण करण्याची सूचना या समितीला करण्यात आली आहे.मात्र आपल्या मागण्यांवर ठाम राहून कर्मचारी संपावर आहेत.यामध्ये ३ हजार ५२ कर्मचा-यांना निलंबित तर ३४५ कर्मचा-यांना बडतर्फ करण्यात आले आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात शेकडो एसटी कर्मचारी गेल्या १५ दिवसांपासून ठाण मांडून आहेत.
परिवहनमंत्री अनिल परब यांनी संपाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेवून विविध मुद्द्यावर चर्चा केल्यानंतर आज एसटी कर्मचारी संघटना आणि एसटी महामंडळाचे अधिकारी यांच्यात यावर तोडगा काढण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला परिवहनमंत्री अनिल परब उपस्थित होते.ही बैठक संपल्यावर परब यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की,कर्मचा-यांची वेतनवाढीची महत्वाची मागणी आहे.मात्र यावर निर्णय घेण्यासाठी न्यायालयाच्या निर्देशानुसार समिती स्थापन करण्यात आल्याने या निर्णयाचे उल्लंघन होवू शकते.त्यामुळे तिढा कायम राहू नये म्हणून समितीचा अहवाल येई पर्यंत अंतरिम वाढ देण्याचा प्रस्ताव आजच्या बैठकीत ठेवण्यात आला असल्याचे परब यांनी स्पष्ट केले.न्यायालयाच्या निर्णयानुसार समिती गठीत केली आहे. या समितीचा जो निर्णय येईल तो आम्हाला मान्य असेल त्यामुळे कर्माच-यांनी संप मागे घ्यावा असे आवाहनही परब यांनी केले.राज्य सरकारच्या नव्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी उद्या ११ वाजता एसटी कर्मचा-यांसोबत पुन्हा बैठक होणार असून या बैठकीत संपावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.