मातोश्रीचे पॉवर सेंटर आता ‘वाय.बी.चव्हाण सेंटर’ मध्ये : दरेकरांचा खोचक टोला

मुंबई नगरी टीम

मुंबई । एकेकाळी मातोश्री हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे पॉवर सेंटर होते. सरकार कोणाचेही असो बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे रिमोट कंट्रोल होता,त्यामुळे मातोश्री पॉवर सेंटर होतं,परंतु हे पॉवर सेंटर आता यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये शरद पवार यांच्याकडे गेले आहे,असा खोटक टोला विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी लगावला.

संजय राऊत यांनी सांगितलं की मोर्च्यामध्ये आग ओतण्याचे काम काही लोक करीत आहेत, त्याबद्दल प्रसिध्दीमाध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगितले की,संजय राऊत एसटी कर्मचाऱ्यांना मूर्ख समजत आहेत. पण एसटी कर्मचा-यांना सर्व कळतंय. एसटी कर्मचारी काही लहान बाळ नाही की त्यांना कळत नाही. त्यामुळे तुमची कोरडी सहानुभूती नको, तर विलिनीकरणावर बोला. कोरड्या सहानभूतीची एसटी कर्मचाऱ्यांना आवश्यकता नाही. तुम्ही किती क्लुप्त्या करा व किती दबावशाही करा पण जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत एसटी कर्मचारी माघार घेणार नाहीत असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

आंदोलनाचा पोरखेळ सरकारने चालविला आहे. मंत्रालय सोडून अन्य ठिकाणी चर्चा कशाला करीत आहात. चर्चा करावयाची असतील तर रितसर कर्मचा-यांचे प्रतिनिधी तसेच सदाभाऊ खोत व गोपीचंद पडाळकर यांच्याबरोबर सरकारने चर्चा करावी. सरकारचा प्रतिष्ठेचा विषय असेल तर चर्चेसाठी सर्व एसटी कर्मचारीही येतील. पण आता अजून चर्चा तरी करायची आहे. सरकारने आता एका वाक्यात जाहिर करावे की, विलीनीकरण करणार की नाही व याचा निर्णय जाहीर करा असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.सरकारमध्ये विलिनीकरण केल्यानंतर एसटी कशी नफ्यात आणायची व त्याचे आर्थिक गणित कसं जमवायचं ते देवेंद्रजी फडणवीस आपल्याला सांगतील, परंतु सरकारची विलिनीकरण करण्याची इच्छाच नाही. कारण तुमच्या पोटात एक आणि ओठात दुसरे आहे. सरकारच्या पोटामध्ये एसटीचे खासगीकरण करण्याचा डाव आहे असा आरोपही दरेकर यांनी केला.

मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि परिवहन मंत्री यांनी एकत्रित येऊन एसटी कर्मचा-यांच्या भल्यासाठी निर्णय घ्याव्या. आवश्यकता असेल तर दोन्ही विरोधी पक्षनेते व कर्मचारी प्रतिनिधी चर्चेसाठी येतील पण हा विषय मार्गी लावावा असे सांगतानाच दरेकर म्हणाले की, खोत आणि पडळकर यांच्याबद्दल कोणाला जेलसी होत असेल तर आम्ही काय करणार. दोघेही नेते बहुजनांसाठी व कष्टकऱ्यांसाठी काम करतात. पण सरकार फक्त टिका करण्याचे काम करीत आहे. पुन्हा पुन्हा सरकारचे तेरावे घालण्याची वेळ येऊ देऊ नका. आमचे आंदोलन सनदशीर व शांततेच्या मार्गाने सुरु आहे. पण उद्या जर या कर्मचाऱ्यांची खरच माथी भडकली , तर एसटी कर्मचारी सरकारला सळो की पळो करून सोडतील आणि म्हणून सरकारने कर्मचाऱ्यांचा फार अंत पाहू नये असा इशाराही दरेकर यांनी यावेळी दिला.

Previous articleधनंजय मुंडेंचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ प्रत्यक्षात येणार ; ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मोठा दिलासा
Next articleएसटीचा संप उद्या मिटणार ? उद्या सकाळी ११ वाजता होणा-या बैठकीत होणार निर्णय