मुख्यमंत्री अधिवेशनाला प्रत्यक्ष येणार आहेत का ? नसतील तर नागपूरला अधिवेशन घ्या !

मुंबई नगरी टीम

मुंबई । नागपूर करारानुसार नागपूर मध्ये विधिमंडळाचे अधिवेशन घेणे गरजेचे असून राज्य सरकारने हिवाळी अधिवेशन नागपूरमध्येच घ्यायला हवे अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर तसेच विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.ठाकरे सरकारला मुळातच विधिमंडळाच्या कामकाजात रस नसून,हे सरकार नागपूर मध्ये अधिवेशन घेण्याच्या विरोधात आहे अशी टीका फडणवीस यांनी करीत अधिवेशन नागपूर मध्येच घेतले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.मुंबईत होणा-या अधिवेशनासाठी तरी मुख्यमंत्री ठाकरे येणार आहेत का ? असा सवाल करीत जर ते येथेही प्रत्यक्ष येणार नसतील तर मग अधिवेशन नागपूरमध्ये घेण्यास काय हरकत आहे अशी विचारणा दरेकर यांनी केली.

कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते फडणवीस पत्रकारांशी बोलताना म्हणाले की,ठाकरे सरकारला मुळातच विधिमंडळाच्या कामकाजातच रस नाही. शिवाय नागपूरात अधिवेशन घेण्याच्या विरोधात हे सरकार आहे. हिवाळी अधिवेशन नागपूर मध्येच घेतले गेले पाहिजे अशी मागणी फडणवीस यांनी करून मुख्यमंत्री प्रकृतीचे कारण पुढे करून अधिवेशन नागपूरला जाणीवपूर्वक घेतले जात नाही अशी टीका त्यांनी केली.राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर पासून मुंबईत सुरू होणार आहे.या अधिवेशनाचा कालावधी ठरविण्यासाठी कामकाज सल्लागार समितीची बैठक आज पार पडली.मात्र हे अधिवेशन नागपूरमध्ये घेण्यास काय हरकत आहे ? असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकर यांनी उपस्थित केला. या संदर्भात पत्रकारांशी बोलताना दरेकर म्हणाले की मुख्यमंत्री आजारी असून त्यांना विमान प्रवास तसेच हेलिकॉप्टर प्रवास करू नका असा वैद्यकीय सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नागपूरात येणे शक्य नाही असे सरकारतर्फे सांगण्यात आले. पण मुंबईतील अधिवेशनासाठी तरी ठाकरे येणार आहेत का हा आमचा प्रश्न आहे आणि जर ते येथेही प्रत्यक्ष येणार नसतील तर मग अधिवेशन नागपूरमध्ये घेण्यास काय हरकत आहे असे आम्ही सरकारला विचारले असेही दरेकर म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हरकिसनदास रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांच्या पाठीच्या मणक्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते सध्या रुग्णालयातच फिजिओथेरपी उपचार घेत आहेत त्यांना काल रुग्णलयातून सोडण्यात येणार होते पण अद्यापी ते तिथेच दाखल आहेत. ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमांतून आजच्या बैठकीला उपस्थित होते. तसेच ते अधिवेशनात व्हिडिओ लिंक माध्यमांतून सहभागी होतील का असा विरोधकांचा सवाल आहे.आणि जर ते असे व्हिडिओ माध्यमांतूनच अधिवेशनात येणार असतील तर मग अधिवेशन नागपूरला घेण्यास हरकत काय आहे असा आग्रह भाजपच्या नेत्यांनी धरला.तर हिवाळी अधिवेशन नागपूरात घ्यावे असा सूर काँग्रेसच्या मंत्र्यांचा होता मात्र आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत २२ ते २८ डिसेंबर पर्यंत अधिवेशनाचे कामकाज ठरविण्यात आले.राज्यातील ठाकरे सरकार विधिमंडळाबाबत गंभीर नाही असा आरोप फडणवीस यांनी करतानाच,या सरकारच्या कार्यकाळात गेल्या दोन वर्षात एकाही अतारांकित प्रश्न व लक्षवेधीला उत्तर आलेले नाही.सभागृहात प्रत्यक्षात जे प्रश्न विचारले जात नाहीत त्या अतारांकित प्रश्नांची उत्तरे सरकारतर्फे सदस्यांना थेट पाठवली जातात पण या सरकारच्या काळात ते होत नाही असे फडणवीस म्हणाले.यासंदर्भातील मुद्दा त्यांनी आजच्या कामकाज सल्लागार समिती बैठकीत उपस्थित केला असता, प्रलंबित अतारांकित प्रश्नांची उत्तरे पाठवली जातील असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले.

मुंबईत होणा-या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी चार ते पाच दिवसांचा आहे या विषयीही विरोधी पक्षांनी हरकत घेतली.हे अधिवेशन किमान दोन आठवड्यांचे घेतले पाहिजे अशी मागणी विरोधकांनी केली. हिवाळी अधिवेशन नागपूरला होत नसेल तर येणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरात घ्यावे अशी मागणीही फडणवीस यांनी केली.

Previous articleअन् पंकजा मुंडे बीडमध्ये अचानक पोहोचल्या पान स्टॅालवर…..!
Next articleखूशखबर : ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात २ हजार रूपयांनी वाढ