मुंबई नगरी टीम
मुंबई । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना तसेच सामाजिक न्याय विभागाच्या वस्तीगृहांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्ज करण्यास दिनांक २८ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
विविध व्यावसायिक शिक्षण प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याने कोणीही पात्र विद्यार्थी वसतिगृह प्रवेश किंवा स्वाधार योजनेपासून वंचित राहू नये यासाठी वसतिगृह प्रवेश व स्वाधार योजनेंतर्गत लाभासाठी अर्ज करण्याची मुदत 28 फेब्रुवारी, 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे.#SJSA pic.twitter.com/h9XAb5EUTC
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 3, 2022
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा मार्फत राबविण्यात येणाऱ्या काही विषयातील प्रवेश प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहेत.एल एल बी, बी एड यांसारख्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सुरू असलेले राउंड फेब्रुवारी महिन्यापर्यंत सुरू राहणार असल्याचे सीईटी विभागाने कळवले असून,त्याअनुषंगाने वसतिगृह प्रवेश किंवा स्वाधार योजना यातील लाभांपासून एकही पात्र विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली असल्याचे मुंडे म्हणाले.सामाजिक न्याय विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहातील प्रवेश व स्वाधार योजना या दोन्हींसाठी अर्ज करण्यास २८ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले असून, पात्र विद्यार्थ्यांनी विहित वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी,असे आवाहन मुंडे यांनी केले आहे.