राष्ट्रवादीत जंबो इनकमिंग : माजी आमदारासह महापौर आणि २८ नगरसेवक राष्ट्रवादीत

मुंबई नगरी टीम

मुंबई । माजी आमदार रशीद शेख यांच्यासह मालेगाव महानगरपालिकेतील महापौरांसह काँग्रेसच्या २८ नगरसेवकांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित मालेगाव मधिल माजी आमदार रशीद शेख यांच्यासह मालेगाव महानगरपालिकेतील महापौरांसह काँग्रेसच्या २८ नगरसेवकांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला.यासर्वांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षात स्वागत केले.मालेगावमधील या पक्षप्रवेशामुळे पुढील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा आमदार निश्चित झाला आहे अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली. कोरोनाचा प्रभाव ओसरल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मालेगावमध्ये मोठी सभा घेणार असल्याचे सुतोवाच पाटील यांनी केले.ज्याप्रमाणे राष्ट्रवादीने पिंपरी-चिंचवड आणि इतर महानगरपालिकांमध्ये विकास साधला आहे,त्याप्रमाणेच राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली मालेगावचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम करु, असाही विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

शेख रशीद शेख शफी १९९९ साली विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले होते. मालेगावमधील प्रत्येक घटकाला मदत करण्यासाठी त्यांचा पुढाकार असायचा. मालेगावचे प्रश्न तळमळीने मांडताना आम्ही त्यांना पाहिले आहे.शेख रशीद यांची समाजाशी बांधिलकी असल्यामुळे त्यांच्यासोबत मनपातील सर्व नगरसेवक राष्ट्रवादीत येत आहेत.शरद पवार यांनीही कधीही जातीपातीचा विचार न करता सर्वांना सोबत घेऊन पक्ष चालवला.अल्पसंख्याक समाजामध्ये शिक्षण कमी आहे,त्यामुळे या समाजाला शिक्षणात प्रगती करण्यासाठी मालेगाव येते काय सुविधा उभारता येतील. तसेच मौलाना अबुल कलाम आझाद महामंडळाच्या माध्यमातून काय योजना आखता येतील, याचा विचार आम्ही नक्कीच करु. तसेच हे आर्थिक वर्ष संपण्याच्या आधी पुन्हा एकदा चांगला निधी मालेगावला देऊ, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.तर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मालेगावमधील कब्रस्तानशी निगडीत प्रश्न लवकर सोडवू असे आश्वासन दिले. तसेच कौशल्य विकास खात्यामार्फत मालेगाव येथे नवीन पॉलिटेकनिकल महाविद्यालय लवकरच उभारू असे आश्वासनही मलिक यांनी दिले.

Previous articleवाचा : कोणत्या नगरपंचायतीत कोणते आरक्षण;नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर
Next articleमंत्रिमंडळाचा निर्णय : आता सुपर मार्केट आणि वॉक इन स्टोअरमध्ये वाईन मिळणार