न्यूयॉर्क टाईम्सने केंद्र सरकारच्या खोटेपणाचा बुरखा फाडला; मोदींनी राजीनामा द्यावा

मुंबई नगरी टीम

मुंबई । पेगॅसस प्रकरणी न्यूयॉर्क टाईम्सने नरेंद्र मोदी सरकारचा खोटेपणा उघड केला आहे. मोदी सरकारने संसद,सर्वोच्च न्यायालय व जनतेला पेगॅसस प्रकरणी वारंवार खोटी माहिती देऊन फसवणूक केली आहे. न्यूयॉर्क टाईम्समुळे सत्य उघड झाले असून मोदी सरकारला आता सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही, त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे,अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, मोदी सरकारने २०१७ मध्ये इस्रायल दौऱ्यावेळी क्षेपणास्त्र प्रणालीबरोबरच पेगॅसस हे स्पायवेअरही खरेदी केले होते. हा करार २ अब्ज डॉलरचा होता. दोन्ही देशांची शस्त्रास्त्रे आणि इंटेलिजेंस गियर पॅकेज खरेदी करण्यावर सहमती झाली होती. यातच पेगॅसस आणि क्षेपणास्त्र प्रणालीचाही समावेश होता. पेगॅससप्रकरणी राहुलजी गांधी यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते. संसदेत काँग्रेस व विरोधी पक्षांनीही या विषयावर सरकारला प्रश्न विचारले होते परंतु मोदी सरकारने याचा साफ इन्कार केला होता. पेगॅससची खरेदी ही फक्त दोन देशातच केली जाते असे इस्त्राईलने स्पष्ट केले होते. त्यावरूनच हे हेरगिरी तंत्रज्ञान सरकारने किंवा सरकारच्यावतीने कोणी खरेदी केले का असा विरोधी पक्षांचा सरकारला थेट सवाल होता परंतु मोदी सरकारने संसद, सुप्रीम कोर्ट व भारतीय जनतेला खोटी माहिती दिली, त्यांची दिशाभूल केली हे आता स्पष्ट झाले आहे.

पेगॅससच्या माध्यमातून काँग्रेस नेते राहुल गांधी, त्यांच्या कार्यालयातील ५ सहकारी, विरोधी पक्षांचे नेते, माजी पंतप्रधान देवेगौडा, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, न्यायाधीश, पत्रकार, संरक्षण दलातील अधिकारी, सरकारविरोधी भूमिका घेणारे सामाजिक कार्यकर्ते यांच्याबरोबरच मोदी सरकारमधील काही मंत्री व त्यांच्या स्टाफची हेरगिरी करण्यात आली होती. संविधानाने दिलेले व्यक्तीस्वातंत्र्य अशा पद्धतीने हेरगिरी करत धोक्यात आणून त्यांच्या खाजगी आयुष्यात घुसखोरी केली आहे. केंद्र सरकारने हेरगिरी केली नसल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दिले होते परंतु आता न्यूयॉर्क टाईम्सनेही मोदी सरकारचा खोटा बुरखा टराटरा फाडला आहे, त्यांना सत्तेवर राहण्याचा कोणताच नैतिक अधिकार राहिलेला नाही, असे पटोले म्हणाले.

Previous articleइस्रायल मधिल रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देणार
Next articleराज्यात मास्क मुक्ती नाहीच; मास्क वापरणे बंधनकारक