पवारसाहेब आम्ही पीत नाही,तुम्हीच वाईन आणि दारू मधला फरक समजून सांगा !

मुंबई नगरी टीम

मुंबई । आपण पीत नसल्याने आपल्याला वाईन आणि दारूमधील फरक समजत नाही. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनीच तो समजून द्यावा.किराणा दुकानांमध्ये वाईन उपलब्ध करण्याच्या निर्णयाला विरोध झाल्यामुळे पवारांना दुःख झाले असले तरी या निर्णयाच्या विरोधात गावोगाव महिला रस्त्यावर उतरल्यानंतर पवारांना खरे दुःख होईल,असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हाणला.

वाईन म्हणजे दारू नाही असे सांगणे हा तमाशा काय चालला आहे,हे कळत नाही. छाप्यात गांजा सापडला की त्याला हर्बल तंबाखू म्हणायचे तसेच वाईन म्हणजे दारू नव्हे असे समर्थन चालू आहे. वाईन ही दारू नसेल तर दारुच्या दुकानावर वाईन शॉप असा बोर्ड लाऊ नका. त्याच्या जागी अमृत शॉप, नीरा शॉप असे काहीही म्हणा.वाईनचा निर्णय हा मुठभर लोकांचे भले करण्यासाठी घेतला आहे. पण हा निर्णय शेतकऱ्याच्या भल्यासाठी घेतल्याचे दाखविले जात आहे. शेतकऱ्यांचे भले करणार असाल तर गेल्या दोन वर्षात राज्यात शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी काय केले ते सांगा. अजूनही अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्तीसाठीची नुकसान भरपाई पोहोचलेली नाही, शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी पूर्ण नाही, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन भत्ता मिळालेले नाही असेही पाटील म्हणाले.

ते म्हणाले की, किराणा मालाच्या दुकानात वाईन उपलब्ध करण्याच्या निर्णयामुळे जनतेत संताप आहे. विशेषतः ग्रामीण भागात महिलांमध्ये या निर्णयाला तीव्र विरोध आहे. गावोगावच्या महिला आता रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करतील त्यावेळी शरद पवारांना खरे दुःख होईल.महाविकास आघाडी सरकार जनतेच्या संयमाची परीक्षा पाहत आहे. मोदी सरकारने पेट्रोल डिझेलवरील कर कमी करून दिलासा दिला. पाठोपाठ २२ राज्यांनी इंधनावरील व्हॅट कमी करून जनतेला अधिक दिलासा दिला. परंतु महाराष्ट्रात मात्र राज्य सरकारने अजूनही पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी केलेला नाही. आता या विषयावर मोठे आंदोलन झाल्यावरच या सरकारचे डोळे उघडतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Previous articleपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हाजीर हो ! २ मार्चला उपस्थित राहण्याचे आदेश
Next articleडोंबिवलीतील १५६ धोकादायक कारखाने स्थलांतरित होणार