मुंबई नगरी टीम
मुंबई । अमरावती येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविण्यावरून वाद निर्माण झाला होता.या प्रकरणी अपक्ष आमदार रवी राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटले.मला अटक करण्यासाठी मोठ्या नेत्याचे पोलीस अधिका-यांना फोन करण्यात आले त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत.मी जर खोटं बोलत असेल तर मला येथेच फाशी द्या असे अपक्ष आमदार रवी राणा यांनी विधानसभेत म्हटल्याने गोंधळ निर्माण झाला.या प्रकरणी संबंधित अधिका-यांवर कारवाई करा अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लावून धरल्याने या प्रकरणाची चौकशी अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था यांच्या मार्फत करण्यात येईल,अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली.
अमरावती येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविण्याचा मुद्दा अपक्ष आमदार रवी राणा यांनी उपस्थित केला.या प्रकरणी आयुक्तांवर शाईफेक करण्यात आली हे निषेधार्ह आहे. ही घटना घडली त्यावेळी आपण दिल्लीत होतो.तरीही माझ्यावर कलम ३०७ आणि ३५४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.माझ्या घरी पोलीसांचा मोठा फौजफाटा पाठविण्यात आला.त्यावेळी माझ्या घरी माझे वृद्ध आई-वडिल आणि पत्नी खा.नवनीत राणा यांना होते त्यांनाही त्रास देण्यात आला असे राणा यांनी सांगून पोलीस आयुक्त आणि मनपा आयुक्त यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.माझे म्हणणे ऐकून घेतले नाही तर मी फाशी घेईन असा इशाराही रवी राणा यांनी यावेळी दिला.राज्यात अशा प्रकारे पोलीस बेछूट होतील असे सांगून, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी केली.तर या प्रकरणाची सर्वपक्षीय आमदारांची चौकशी समिती नेमून चौकशी करावी अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली.या प्रकरणाची चौकशी राज्याच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था यांच्या मार्फत करण्यात येईल व अहवाल आल्यानंतर विरोधी पक्षनेत्यांसोबत त्यावर चर्चा करण्यात येईल अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली.