मुंबई नगरी टीम
मुंबई । निधी वाटपावरून महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाच्या आमदारांची नाराजी असल्याची चर्चा असतानाच महाविकास आघाडीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यपद्धतीवरून नाराजी असल्याचे वृत्त काही माध्यमांत आल्यावर यावर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण देत त्यांनी या वृत्तांचे खंडन करीत गृहमंत्री वळसे पाटील उत्तम काम करीत आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. निधीवाटपावरून काँग्रेस पक्षाच्या आमदारांची पक्षाध्यक्षा सोनिया गांधी या पत्र लिहीले असतानाच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यपद्धतीवरून मुख्यमंत्री ठाकरे हे गृहमंत्री वळसे पाटील यांच्यावर नाराज असल्याचे चर्चा कालपासून सुरू होती.शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर व आमदार तानाजी सावंत यांनी महाविकास आघाडीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा असल्याची उघड टीका केली होती.विरोधी पक्षातील नेते शिवसेना पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप करीत असताना गृहमंत्री यावर आक्रमक नसल्याची चर्चा दबक्या आवाजात होती.त्यातच गृहमंत्री वळसे पाटील यांनी आज मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतल्याने उलट सुलट चर्चांना उधाण आले होते.मात्र आता यावर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज अशा बातम्या काही माध्यमांवर येत आहेत.या बातम्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खंडन केले आहे अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास्त करणाऱ्या असून माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे,आणि ते उत्तम काम करीत आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.