पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या सुब्रमण्यम स्वामींना निमंत्रण मात्र देवेंद्र फडणवीसांना टाळलं

मुंबई नगरी टीम

मुंबई । मुंबई मेट्रोच्या २ अ आणि मेट्रो ७ चे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थित उद्या होत असून,या कार्यक्रमाला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह भाजपच्या आमदारांना निमंत्रण देण्यात आले असले तरी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मात्र निमंत्रण देण्यात आले नाही.विशेष म्हणजे भाजपचे खासदार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात टीकास्त्र सोडणारे सुब्रमण्यम स्वामी यांना विशेष निमंत्रण दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ चे उद्घघाटन होणार आहे.या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका एम.एम.आर.डीएने जाहीर केली असून,या कार्यक्रमासाठी भाजपचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह दहिसरच्या आमदार मनिषा चौधरी, सुनिल राणे.योगेश सागर,अतुल भातखळकर अमित साटम,भारती लवेकर भाई गिरकर आणि उत्तर मुंबईचे खासदार गोपाल शेट्टी यांना निमंत्रण देण्यात आले आहे.मात्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही.मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते होणा-या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार,केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले,नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,उद्योगमंत्री सुभाष देसाई,परिवहनमंत्री अनिल परब,पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे,मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख,नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे तर विशेष निमंत्रित म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सभापती रामराजे नाईक निंबाळकर,भाजपचे राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी,शिवसेना खासदार अनिल देसाई,संजय राऊत,प्रियांका चतुर्वेदी,राज्यसभा सदस्य नरेंद्र जाधव,शिवसेना खासदार गजानन किर्तीकर आदींना निमंत्रण देण्यात आले आहे.

Previous article‘हे’ नुकसान झाले नसल्यास बैलगाडा शर्यतीमुळे दाखल झालेले खटले मागे घेणार
Next articleगृहमंत्र्यांच्या अदलाबदलीवर खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिले स्पष्टीकरण..काय म्हणाले मुख्यमंत्री ?