गडचिरोली । महाविकास आघाडी सरकारला राज्यातील गरिबांची नाही,तर बेवड्यांची चिंता अधिक आहे अशी टीका करतानाच,हे सरकार इतके नालायक आहे की,वेश्यांसाठी दिल्या जाणा-या निधीत सुद्धा त्यांनी भ्रष्टाचार केला आहे.असे करणा-यांना काय म्हणतात,ते मी सांगणार नाही.तो शब्द संजय राऊत वापरतात असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आज गडचिरोली भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाजनआक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित करताना राज्यातील महाविकास आघाडीच्या कारभारावर हल्लाबोल केला.धानाला बोनस,कृषीपंपाला २४ तास वीज,वीजतोडणी बंद करा, कर्जमाफी आणि अनुदानाची रक्कम त्वरित देण्यात यावी,अवकाळी, अतिवृष्टी,वादळ, किडीची मदत तत्काळ देण्यात यावी,ओबीसी आरक्षण तसेच नवाब मलिक यांचा राजीनामा तत्काळ घ्यावा अशा विविध १६ मागण्यांसाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती.यावेळी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार,चंद्रशेखर बावनकुळे, खा. अशोक नेते,राजे अंबरिशराव आत्राम, आ. देवराव होळी, कृष्णा गजबे, किर्तीकुमार भांगडिया आदी भाजप नेते यावेळी उपस्थित होते.
महाजनआक्रोश मोर्चाची सुरूवात गडचिरोलीपासून करण्यात आली कारण, गडचिरोलीपासून बुलंद होणारा आवाज हा क्रांती घडवितो असे फडणवीस यांनी सांगून,महाविकास सरकारमध्ये सध्या भ्रष्टाचाराची ट्वेंटि-ट्वेंटी सुरू असून,मुंबईतील बिल्डरांचा कर थकला आहे,हिंमत असेल तर तो वसुल करा.त्यांच्याकडून मालपाणी मिळते,म्हणून तेथे ढिल आणि आमच्या शेतक-यांकडून जुलमी वसुली सुरू आहे हा अजब कारभार आहे.दुसरीकडे बारमालकांची फी ५० टक्के कमी केली आहे पण, गडचिरोली, नंदूरबारमध्ये शेतक-यांचे वीजबिल ५० टक्के कमी करू,असे त्यांना वाटले नाही. विदेशी दारुवरील कर अर्धा केला. पण, शेतक-यांना कोणतीही मदत केली नाही.या सरकारला गरिबांची नाही, तर बेवड्यांची चिंता अधिक आहे अशी टीका फडणवीस यांनी केली.हे सरकार इतके नालायक आहे की, वेश्यांसाठी दिल्या जाणा-या निधीत सुद्धा त्यांनी भ्रष्टाचार केला आहे.असे करणा-यांना काय म्हणतात, ते मी सांगणार नाही.तो शब्द संजय राऊत वापरतात असा टोलाही त्यांनी लगावला.
विदर्भातील ५ आणि कोकणातील ३ जिल्ह्यांना धानाचे पैसे द्यायचे आहेत.पण, हे १२५ कोटी रुपये सुद्धा सरकार द्यायला तयार नाही.दुसरीकडे मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचा अध्यक्ष ४०० कोटींचा भ्रष्टाचार करतो. हे आधी काय सांगायचे ?तर बांधावर जाऊन ५० हजार देऊ.पण, आज स्थिती काय आहे ? 5 हजार रुपये शेतक-यांना द्यायला तयार नाही.आमच्या पाठित सोडा,या सरकारने सामान्य माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे असा हल्लाबोलही त्यांनी सरकारवर केला.राज्यातील महाविकास आघाडी सरकार सामान्यांचा विचार करीत नसले तरी केंद्रातील सरकार सामान्यांचा विचार करते. त्यांच्याकडून अधिकाधिक मदत प्रत्येकाला मिळते आहे.आदिवासींसाठीच्या अन्नधान्याच्या योजनेत प्रचंड भ्रष्टाचार हे सरकार करते आहे. कुत्रा देखील खाणार नाही, असे धान्य आदिवासींना देण्यात येते आहे. आदिवासींच्या तोंडचा घास पळविणारे हे पापी सरकार आहे.मतांसाठी ओबीसींचा वापर केला जातो असे सांगतानाच ओबीसींसाठी पहिला संवैधानिक आयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तयार केला.मात्र, महाविकास सरकारने ओबीसींचे आरक्षण घालविले असे सांगून ओबीसींचे आरक्षण संपविण्याचे षडयंत्र होते आहे.भाजपाचा एकही कार्यकर्ता जिवंत आहे, तोवर हे आरक्षण संपू देणार नाही.अखेरच्या क्षणापर्यंत भाजपा ओबीसी आरक्षणासाठी संघर्ष करीत राहील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.