मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्यात सुरू असलेल्या भोंगा वादंगावरून राष्ट्रावादीचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. भोंगा हा फक्त दंगल माजविण्यासाठी निर्माण झालेला आहे असा आरोप करीत, भोंग्याच्या मागून कोण बोलतंय, हे सर्वांना कळतंय त्यामुळे या विषयाला अधिक महत्त्व न देता नोकऱ्या किती गेल्या याचे मोजमाप आहे का ? याकडे लक्ष द्या असा टोला आव्हाड यांनी लगावला.
भोंग्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.यावरून आता गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मनसेचा समाचार घेतला आहे.सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांना मान्य झालाच पाहिजे.समाज व धर्म कोणताही असो सर्वोच्च न्यायालय अंतिम आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश सर्वांना ऐकावेच लागतील असेही आव्हाड यावेळी म्हणाले.राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात ते पत्रकाराशी बोलत होते.भोंग्याचा मुद्दा हा फक्त दंगल माजविण्यासाठी निर्माण झालेला आहे असा आरोप त्यांनी करून भोंग्याच्या मागून कोण बोलतंय,हे सर्वांना कळतंय त्यामुळे या विषयाला अधिक महत्त्व न देता नोकऱ्या किती गेल्या याचे मोजमाप आहे का ? याकडे लक्ष द्या असा टोला आव्हाड यांनी लगावला.महागाई किती वाढली आहे. याबद्दल कुणी बोलत नाही.पेट्रोलचे दर १२५ रुपयांवर गेले आहेत,त्याबद्दल कुणी बोलत नाही. २०१४ मध्ये पेट्रोलचा दर ७१ रुपये होता. त्यावेळी ४१० रुपयांना मिळणारा गॅस सिलेंडर आज हजाराच्यावर गेला आहे.पेट्रोल-डिझेल-सीएनजी महाग झाल्यामुळे दळणवळण महाग होते त्यामुळे भाजीपाला, अन्नधान्याच्या किंमती वाढतात असेही आव्हाड म्हणाले.
उद्या घराच्याबाहेर सामान्य लोकांची मुले जाणार आहेत. धर्म कोणताही असो पण दगडाला दगड लागून त्यातून अग्नी निर्माण होतो. त्या अग्नीत कोणत्याही नेत्याची मुल जळणार नाही, पण तुरुगांत मात्र सामान्य माणसाची मुले खितपत पडतील.या देशातील तरुणांना दंगलीच्या वाटेवर नेऊन सामान्य माणसांना देशोधडीला लावायचे हा प्रकार तरी अमान्य असल्याचे आव्हाड म्हणाले.आज सकाळी वर्तमानपत्र वाचत असताना निदर्शनास आले की, भारतात केवळ आठ दिवस पुरेल इतका कोळशाचा साठा आहे. हे काय दर्शविते ? आज जर आपण कोळसा व्यवस्थित जमवला नाही. तर हा देश कमीत कमी १४ तास अंधारात राहिल.श्रीलंकेची महागाई आणि आपल्या महागाईत केवळ १७ टक्क्याचा फरक आहे. या देशाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार केला तर पुढच्या काळात आपली श्रीलंका होणार नाही, याची काळजी सर्व पक्षांनी, धर्मांनी, माणसांनी घेतली पाहिजे. आता हिंस्र श्वापदे जर तुमच्या अंगात येत असतील तर कुणीच काही करु शकत नाही असा टोलाही आव्हाड यांनी लगावला. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी देशाच्या महागाईबाबत बोलताना संतापजनक प्रतिक्रिया दिली. याचाही समाचार आव्हाड यांनी घेतला. हे लोक बेफिकीरी दाखवतायत, याचे कारण जर आपण धर्माचा द्वेष पसरवला तर आपण काहीही करु शकतो, हा आत्मविश्वास त्यांच्याकडे आहे. २०१४ रोजी ७१ रुपये प्रतिलिटर असलेले पेट्रोल आज सव्वाशे रुपयांवर आलेले असताना अर्थमंत्री बोलणार नसतील तर आपण काय बोलणार ? असेही आव्हाड म्हणाले.