मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिला गंभीर इशारा…काय म्हणाले राज ठाकरे !

मुंबई नगरी टीम

मुंबई । मशिदींवरील भोंग्यांविरोधात सुरु करण्यात आलेले आंदोलन केवळ एक दिवसाचे नसून जोपर्यंत भोंग्यांचा विषय निकाली लागणार नाही,तोपर्यंत दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाजविण्याचे आंदोलन सुरुच राहणार,असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. तर मनसे पदाधिकाऱ्यांकडून होणाऱ्या धडपकड विरोधात आश्चर्य व्यक्त करतानाच अनधिकृत मशिद आणि भोग्यांविरोधात कारवाई कधी करणार, असा सवालही ठाकरे यांनी आज उपस्थित केला.

राज्यातील मशिदींवरील भोंग्यांविरोधात आंदोलनाची घोषणा केल्यानंतर बुधवारी आपली भूमिका मांडण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी वरील इशारा दिला. तर मुंबईत आज ९० ते ९२ टक्के ठिकाणी पहाटेची अजान लाऊडस्पीकरवर देण्यात आली नसल्याचे स्पष्ट करताना त्या सर्व ठिकाणांच्या मौलवींचे ठाकरे यांनी आभार मानले. दरम्यान, मुंबईत १ हजार १४० मशिदींपैकी १३५ ठिकाणी अजान लाऊडस्पीकरवर झाल्याचे सांगतानाच यावर कारवाई कधी करणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

मुंबईसह राज्यात मंगळवार रात्रीपासून मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरु करण्यात आली आहे. त्याविरोधाती नाराजी व्यक्त करताना राज ठाकरे म्हणाले की, नोटीसा, धरपकड असले प्रकार आमच्या बाबतीतच का होतात, हा प्रश्न आहे. कायद्याचे पालन करणाऱ्यांना शिक्षा देणार आणि कायदा पाळत नाही त्यांना मोकळीक, असला हा प्रकार आहे. हे आंदोलन फक्त एक दिवसाचे आणि केवळ सकाळच्या अजानपुरते नव्हते. तर, ३६५ दिवस दररोज चार ते पाच वेळा भोंगा वाजतो तो बंद झाला पाहिजे. हा रोजचा दिवसभराचा त्रास बंद झाला पाहिजे. भोंगा लावायचा असेल तर आम्हाला एका दिवसाची परवानगी मिळते. सणावाराला काही दिवसांची असते. मग, यांना वर्षभराची परवानगी कशी काय दिली जाते, असा प्रश्नही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.सर्वोच्च न्यायालयाचा आधार घेत राज ठाकरे यांनी यासंदर्भात पुन्हा एकदा या भोंग्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले असतानाही भोंगे कसे काय वाजतात, असा प्रश्न करतानाच न्यायालयाच्या निर्णयाचा अशा पद्धतीने अवमान केला जातो. यावर न्यायालय काय करते हे ही मला पाहायचे आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.मशिदीवरील भोंगे हा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे. ते खाली उतरवले गेलेच पाहिजे, अशी भूमिका मांडतानाच हा विषय श्रेयवादाचा नाही, मला याचे श्रेय देखील नको. हा समाजाचा विषय आहे. तसेच केवळ मशिदीवरचेच नव्हे तर मंदिरावरील भोंग्यांचाही त्रास होत असेल तर तो बंद व्हायला हवा असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले.

Previous articleसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया; ठाकरे सरकारवर केली टीका
Next articleओबीसी आरक्षण धोक्यात येण्यास सर्वस्वी राज्य सरकारच जबाबदार : प्रविण दरेकर