सत्तेतून बाहेर पडण्याची नाना पटोलेंची हिम्मत आहे का ? प्रविण दरेकरांचा टोला

मुंबई नगरी टीम

मुंबई । एका बाजून खंजीर खुपसला बोलायचे आणि सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसायचे. तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो, याच अर्थाने आम्ही नाना पटोले यांच्या विधानाकडे पाहतो. खंजीर खुपसला असे त्यांना वाटत असेल तर मग आहे का हिम्मत सत्तेतून बाहेर पडण्याची ? त्यामुळे तोंडाची वाफ घालवून गप्प बसण्यापलीकडे नाना पटोले काही करू शकत नाहीत,असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, असे वक्तव्य कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. त्यासंदर्भात बोलताना विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले की, ते वाद घालतील, एकमेकांना शिव्याही घालतील, तरीही ते एकमेकांना घट्ट पकडून आहेत, त्यामुळे वाद वगैरे हे पेल्यातील वादळ आहे. राष्ट्रवादी आणि भाजपची जवळीक वगैरे आहे, असे मला वाटत नाही. स्थानिक ठिकाणी काही निर्णय झाले असतील तर त्याची मला माहीती नाही असेही दरेकर यांनी सांगितले ज्या प्रकारे राज्य सरकारने भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस करणे, आमच्या नेत्यांना अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणे, असे राज्याच्या इतिहासात कोणत्याही सरकारने हुकुमशाही पध्दतीने कारवाया केलेल्या नाहीत. महाविकास आघाडीचे सरकार मस्तवाल झालेले आहे. आमच्या हातात सरकार आहे, आम्ही काहीही करू शकतो, असा अहंभाव त्यांना आलाय. परंतु फार काळ सत्तेची मस्ती चालत नसते अशी टिकाही दरेकर यांनी केली.

दरेकर पुढे म्हणाले की, प्रत्येक मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. उत्तर प्रदेशचे कार्यालय मुंबईत सुरू होऊन उत्तर प्रदेश आणि मुंबईचे संबंध वाढणार असतील, येथील उत्तर भारतीयांना त्यांच्या सरकारच्या माध्यमातून मदत होणार असेल, तर महाराष्ट्र सरकारवरचा भार कमी होऊ शकतो त्यामुळे यामध्ये कोणाला वाईट वाटायचे कारण नाही. प्रत्येक राज्य सरकारला आपली लोक जिथे जिथे आहेत, त्या राज्यात मदत करण्यात गैर नाही, असेही मतही दरेकर यांनी व्यक्त केले.

Previous articleजिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी येत्या ५ जूनला मतदान
Next articleयाला पाठीत खंजीर खुपसणे नाही तर काय म्हणायचे ? नाना पटोलेंच्या ‘त्या’ पत्राने खळबळ