ठाकरे सरकारचा निर्णय म्हणजे मे महिन्यात ‘एप्रिल फूल’ करणारा

मुंबई नगरी टीम

मुंबई । महाविकास आघाडी सरकारने राणाभीमदेवी थाटात राज्यात इंधनावरील मूल्यवर्धित कर कमी झाल्याची माहिती शासकीय ट्विटर हँडलवरून प्रसारित केली.मात्र ही शुद्ध फसवणूक आहे. महाविकास आघाडी सरकारने दरकपातीचा कोणताच निर्णय घेतला नाही, तर केंद्राच्या निर्णयाचा हा स्वाभाविक परिणाम आहे असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

इंधनाची मूळ किंमत,विक्रेत्यांना दिले जाणारे कमिशन,रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेस तसेच अ‍ॅग्रीकल्चर अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सेस अशा सर्व बाबींवर राज्य सरकार करआकारणी करते. त्यामुळे यापैकी कोणत्याही घटकातील कर केंद्राने कमी केला तर राज्याचा कर आपोआप कमी होतो.त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोलवर २.०८ रुपये आणि डिझेलवर १.४४ रुपये जे कमी झाले, तो रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर सेस केंद्र सरकारने कमी केल्याने राज्याचा कर कमी झाला आहे असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.स्वत: काहीच करायचे नाही आणि केंद्राने घेतलेल्या निर्णयाच्या परिणामांचे सुद्धा श्रेय घ्यायचे, हे फारच गंभीर आहे.महाविकास आघाडी सरकारने लोकांना मुर्ख न बनविता तत्काळ पेट्रोल-डिझेल दरकपातीचा निर्णय घ्यावा,अशी मागणीही त्यांनी केली आहे.राज्यसरकारची कालची घोषणा पाहून ‘उंटाच्या तोंडात जिरे असे म्हटले होते. पण, प्रत्यक्षात तर हा संपूर्ण प्रकार मे महिन्यात ‘एप्रिल फूल करणारा ठरला असा टोलाही त्यांनी राज्यसरकारला लगावला आहे.

Previous articleठाकरे सरकारने दारूप्रमाणेच पेट्रोल-डिझेलवरील करातही ५० टक्क्यांनी कपात करावी
Next articleएक दिवस देशात व राज्यात पुन्हा काँग्रेसचीच सत्ता येईल यासाठी प्रयत्न करा