महाराष्ट्रात मराठी आणि गुजराती दोघेही दुधात साखरेसारखे एकमेकात विरघळून गेलेत

मुंबई नगरी टीम

मुंबई । महाराष्ट्रात मराठी आणि गुजराती हे दोघेही दुधात साखरेसारखे एकमेकात विरघळून गेले आहेत,हेच तर आपले प्रेम आहे.गुजराती आणि मराठीचे नातं अधिकाधिक दृढ व्हावं हीच माझी सदिच्छा आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित म्हणाले.

मुंबईतील गुजराती भाषेतील मुंबई समाचार या दैनिकाच्या द्विशताब्दी कार्यक्रम सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला गुजराती कळते पण बोलता येत नाही असे सांगून,महाराष्ट्रात मराठी आणि गुजराती हे दोघेही दुधात साखरेसारखे एकमेकात विरघळून गेले आहेत आणि हेच तर आपलं प्रेम आहे असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.गुजराती आणि मराठीचे नाते अधिकाधिक दृढ व्हावे हीच माझी यानिमित्ताने सदिच्छा आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

१८२२ पासून सुरू झालेले मुंबई समाचार जगातील आणि देशातील अनेक घटनांचे साक्षीदार आहे.मुंबई समाचारने या सगळ्या ऐतिहासिक घटनांचा आणि पारतंत्र्यातल्या लढ्याच्या त्या वेळच्या बातम्या आणि छायाचित्रांचा संग्रह जतन करावा अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.मी देखील वृत्तपत्र चालवतो वृत्तपत्र चालवणं कठीण असतं असे सांगून,वृत्तपत्र कोण कुठे चुकतंय ते त्यांना दाखवून देणं, पत्रकारांचे कर्तव्य असतं आणि मुंबई समाचार हे कर्तव्य पार पाडत आहे अशा शब्दात त्यांनी कौतुक केले.काही वृत्तपत्र ही स्वातंत्र्य चळवळीमध्ये उभी राहिली आणि टिकली. आज लोकमान्यांच्या केसरी या वृत्तपत्राला देखील १४१ वर्ष झाली आहे याच लोकमान्यांनी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा जाब विचारला होता.मुंबई समाचार किंवा लोकमान्यांचा केसरी, आचार्य अत्रे यांचे मराठा असो, हे इतिहासाचे साक्षीदार आहेत.मुंबई समाचारला दोनशे वर्षे पूर्ण झाली आहेत. यापुढे देखील आणखी शंभर, दोनशे वर्ष या वृत्तपत्राने पत्रकारितेचे कार्य करावे आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा असेही ते म्हणाले.

Previous articleराज्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी संविधान सभागृह ; मंत्री धनंजय मुंडेंचे निर्देश
Next articleमंत्री जितेंद्र आव्हाडांनी दिल्या अण्णा हजारेंना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा