शिवसेनेशी गद्दारी नाही,शिवसैनिक आहोत आणि राहू पण ही परिस्थिती का आली समजून घ्या

मुंबई नगरी टीम

मुंबई । शिवसेनेचे नेते आणि नगरविकासमंत्री यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंड केल्याने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत सापडले आहे.औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी काल आपली खदखद व्यक्त केल्यानंतर शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव यांचा एक व्हिडीओ एकनाथ शिंदे यांनी भायखळाच्या आमदार यामिनी जाधव यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.आम्ही सर्व शिवसेनेतच आहोत आणि यापुढेही शिवसैनिकच राहणार आहे पण हा निर्णय घेण्याची वेळ आमच्यावर का आली, ते तुम्ही समजून घ्यावे असे अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

 

बंडखोरी केलेले शिवसेनेचे आमदार गुवाहटीच्या एका पंचतारांकित हॅाटेल मध्ये असून,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आमदारांना केलेल्या आवाहनानंतर औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी काल आपली खदखद व्यक्त केली होती. त्यानंतर आज एकनाथ शिंदे यांनी आज भायखळाच्या आमदार यामिनी जाधव यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.त्या व्हिडीओत यामिनी जाधव यांनी हे बंड का करावे लागले याचे कारण देत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.काही दिवसातील घडामोडी पाहता शिवसैनिकांचा उद्रेक समजू शकतो,पण आम्हीही शिवसैनिक आहोत,यापुढेही शिवसैनिकच राहणार आहोत किंबहुना हे जग शिवसैनिक म्हणूनच सोडणार आहोत.यशवंत जाधव हे ४३ वर्षे शिवसेनेत आहेत अनेक अडचणी आल्या पण त्यांनी कधीही वेगळा विचार केला नाही. मला कॅन्सर झाला,याची माहिती पक्षाच्या नेत्यांना दिली एक महिला आमदार म्हणून मला अपेक्षा होती की,पक्षाचे नेते आधार देतील विचारपूस करतील पण तसे काही झाले नाही.केवळ किशोरी पेडणेकर आल्या त्यांनी धीर दिला पण ज्याच्याकडून अपेक्षा होती त्यांनी विचारपूस केली नाही.एका आधाराची थाप यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांच्या कुटुंबाला मिळेल. अशी माझी अपेक्षा होती,पण तसं झाले नाही.मी २०१२ पासून नगरसेविका आहे. अनेक आमदारांच्या पत्नींना कॅन्सर झाल्याचे पाहिले आहे. त्यांच्या पत्नींना रुग्णालयात जाऊन भेटल्याचेही मी पाहिले आहे. त्यांच्या पत्नींप्रमाणे माझी अगदी मरणाशय्य अवस्था होणे गरजेचे होते का ? मग माझ्या पक्षातील नेते मला बघायला आले असते ? ही गोष्ट मनात खलत होती.

माझे कुटुंब सात-आठ महिन्यांपासून अनेक अडचणींचा सामना करत आहे. त्यात कुणाचे मार्गदर्शन, आधार, सूचना मिळाल्या नाहीत. आम्ही दोघेच हातपाय मारत होतो. या सर्व परिस्थितीमुळे आम्ही या निर्णयापर्यंत येऊन पोहोचलो. हा निर्णय घेणे, सोपे नव्हते. बऱ्याच दिवसांपासूनची ही प्रक्रिया होती. मनाला आजही यातना होत आहेत. एक मात्र नक्की आहे की,यामिनी जाधव आणि यशवंत जाधव यांनी शिवसेना सोडून कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही.कॅन्सरच्या अवस्थेत भायखळा मतदार संघातील शिवसैनिकांनी आम्हाला जसे समजून घेतले,तसे शिवसैनिकांनी आता आम्हाला समजून घेणे गरजेचे आहे आम्ही शिवसेनेविरुद्ध कधीही जाणार नाही किंवा बेईमानी करणार नाही. काहीतरी त्यामागे कारण असेल, ते शोधणे गरजेचे आहे, असेही जाधव म्हणाल्या.

Previous articleमुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठिंबा ; आघाडी सरकार टिकण्यासाठी प्रयत्न करणार
Next articleकितीही आमदार घेऊन जा,शिवसेनेला काहीही होणार नाही : उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना ठणकावले