कितीही आमदार घेऊन जा,शिवसेनेला काहीही होणार नाही : उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना ठणकावले

मुंबई नगरी टीम

मुंबई । शिवसेना आमदरांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जिल्हा प्रमुख आणि पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला.यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भावुक झाले होते.तुम्हाला तिथे भवितव्य दिसत असेल तर खुशाल जावा,मी थांबवणार नाही.तुम्हाला वाटत असेल तर सांगा मी हे पद आनंदाने सोडण्यास तयार आहे, असेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.एकनाथ शिंदे यांच्या बंडाला भाजपचीच फूस आहे असा आरोप करतानाच,या आमदारांची आग्र्याहून सुटका करावी लागेल असे सांगून,जे भाजपसोबत गेले,ते सर्वजण संपले आहेत.मातोश्रीवर घाणेरडे आरोप केल्यानंतर मी शांत बसणार नाही आपल्यासोबत कोणी नाही असे समजून नवी शिवसेना उभी करा असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले.

पदाधिका-यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की,मी त्या दिवशी मनातले सगळे सांगितले आहे,आजही मन मोकळे करणार आहे.मी वर्षा सोडली म्हणजे मोह सोडला आहे मात्र जिद्द सोडलेली नाही. स्वप्नातही या पदावर जाईन असा विचार केला नव्हता.त्या पदाचा मला कधीच मोह नव्हता,मानेची शस्त्रक्रिया केली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला फार हिंमतीचे काम केले असे सांगितले होते.त्यावेळी मी हिंमत माझ्या रक्तात आहे सांगितले होते.या संवादादरम्यान त्यांनी एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडावर निशाणा साधताना मोठे वक्तव्य केले. झाडाची फळं मेली, तरी मूळ मरू शकत नाही, असे वक्तव्य त्यांनी केले. तसेच मी वर्षावरुन मातोश्रीवर गेलो. मी मोह सोडलाय. जिद्द सोडलेली नाही, असे देखील ते म्हणाले.जो कोणी समोर येईल त्याच्यावर मी विश्वास ठेवेन. शिवसेनेचा पहिला नारळ फुटला होता तशीच परिस्थिती आहे समजा, असे आवाहन ठाकरें यांनी यावेळी शिवसैनिकांना केले.

आपण ज्यांना मोठे केले त्यांची स्वप्ने मोठी झाली, आता ती आपण पुरी करु शकत नाही असे ठाकरे म्हणाले.एकनाथ शिंदे यांच्या मुलाला खासदार केले, मग माझ्या मुलाने काहीच करु नये का असा सवालही त्यांनी केला. या सर्वाचा आता वीट आला असून तीच वीट आपण यांच्या डोक्यात हाणणार असे सांगत त्यांनी बंडखोर आमदारांना थेट आव्हान दिले.आपण यांना सर्व काही दिले. मुख्यमंत्र्यांकडे नगरविकास खाते असते, पण पैशाचा विषय नको म्हणून ते खाते एकनाथ शिंदे यांना दिले. पण आपण ज्यांना मोठे केले त्यांची स्वप्न आता मोठी होत आहेत.ती आपण पुरी करु शकत नाही. महत्त्वाकांक्षा असावी, पण ज्याने दिलं त्यालाच खावे अशी राक्षसी महत्त्वाकांक्षा नसावी असा टोलाही त्यांनी लगावला.आधी यांच्यासाठी बाळासाहेब विठ्ठल होते,आणि आम्ही बडवे होतो.आता मी विठ्ठल आहे आणि आदित्य बडवा आहे असेही ते या सर्वामागे भाजपचा हात आहे.आतापर्यंत जे लोक भाजपसोबत गेले,ते सर्वजण संपले आहेत.मातोश्रीवर घाणेरडे आरोप केल्यानंतर मी शांत बसणार नाही. आपल्यासोबत कोणी नाही असे समजून नवी शिवसेना उभी करा असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले. कितीही आमदार घेऊन जा,शिवसेनेला काहीही होणार नाही, काही आमदार म्हणाले होते की तिकीट कापले तरी आम्ही शिवसेना सोडून जाणार नाही.बंड झाल्यानंतरही शिवसेना दोन वेळा सत्तेत आली अशी असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

Previous articleशिवसेनेशी गद्दारी नाही,शिवसैनिक आहोत आणि राहू पण ही परिस्थिती का आली समजून घ्या
Next articleशिवसेनेतील घडामोडींशी भाजपाचा संबंध नाही ; शरद पवारांच्या आरोपावर भाजपचे स्पष्टीकरण