शिवसेनेतील घडामोडींशी भाजपाचा संबंध नाही ; शरद पवारांच्या आरोपावर भाजपचे स्पष्टीकरण

मुंबई नगरी टीम

मुंबई । शिवसेनेचे नेते व राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. ते राष्ट्रीय पक्ष आहे.ते महाशक्ती आहे.त्यांनी मला सांगितलेले आहे तुम्ही हा निर्णय घेतलेला आहे अत्यंत ऐतिहासिक निर्णय आहे आणि तुमच्यामागे आमची पूर्ण शक्ती आहे असे एकनाथ शिंदे यांनी सांगून त्यांच्या पाठिशी कोण आहे हे स्पष्ट केल्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या घडामोडीमागे भाजपा असल्याचा आरोप केला होता.मात्र राज्यात चालू असलेल्या राजकीय घडामोडींशी भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही,असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी काल गुवाहटी येथिल रॅडिसन ब्ल्यू हॉटेलात बंडखोर आमदारांना मार्गदर्शन करताना आपल्या पाठी राष्ट्रीय पक्ष असून,ते महाशक्ती आहेत.तुम्ही जो निर्णय घेतला आहे तो अत्यंत ऐतिहासिक निर्णय आहे आणि तुमच्यामागे आमची पूर्ण शक्ती आहे. कुठचेही काही लागले तर कधीही कमी पडणार नाही याची प्रचिती आपल्याला जेव्हा जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा तेव्हा सगळ्यांना येईल, असे म्हणाले होते.त्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शिवसेनेच्या दोनतृतियांशपेक्षा अधिक आमदारांनी वेगळी भूमिका घेण्याच्या घडामोडीमागे भाजपा असल्याचा आरोप केला होता.पवार यांनी केलेल्या या आरोपाचे खंडन भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी करून,देशामध्ये सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तसेच ते मा. शरद पवार यांनाही आहे. त्यानुसार ते मत व्यक्त करत असतात.महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपा प्रयत्न करणार नाही. तथापि, अंतर्गत कलहामुळे हे सरकार कोसळेल, असे आपण यापूर्वी सातत्याने म्हणत होतो अशी आठवण करून दिली.भाजपाकडे कोणीही सत्ता स्थापनेसाठी प्रस्ताव सादर केलेला नाही.भाजपाच्या निर्णयप्रक्रियेनुसार महत्त्वाच्या विषयांवर राज्याची कोअर कमिटी विचारविनिमय करून भूमिका निश्चित करते व केंद्रीय नेतृत्वाकडे शिफारस करते असेही पाटील म्हणाले.

Previous articleकितीही आमदार घेऊन जा,शिवसेनेला काहीही होणार नाही : उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना ठणकावले
Next articleविरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचे राज्यपालांना पत्र, केली हस्तक्षेप करण्याची मागणी