बंडखोरांना दुसरा धक्का ; अजून चार आमदारांना अपात्र करण्याची शिवसेनेची मागणी

मुंबई नगरी टीम

मुंबई । एकनाथ शिंदे यांच्या बंडाला साथ देणा-या शिवसेनेच्या १२ बंडखोर आमदारांना अपात्र ठरवावे अशी मागणी करणारे पत्र शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांनी काल विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना दिले होते.त्यापाठोपाठ आज पुन्हा चार आमदारांना अपात्र ठरविण्याबाबतची याचिका गटनेते अजय चौधरी यांनी उपाध्यक्ष यांच्याकडे दिली आहे.संजय रायमुलकर नांदेड उत्तरचे बालाजी कल्याणकर, वैजापूरचे रमेश बोरनारे आणि एरंडोलचे चिमणराव पाटील यांना अपात्र करण्याची मागणी करण्यात आल्याने एकनाथ शिंदे यांच्यापुढील अडचणीत भर पडली आहे.

बंड केलेल्या शिवसेनेच्या आमदारांना शिवसेना पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांनी पक्ष बैठकीला उपस्थित रहाण्याचे आदेश काढले होते.मात्र,या बैठकीला हे आमदार उपस्थित राहिले नाहीत.त्यांनी अनुपस्थित राहण्यासाठी जी कारणे दिली आहेत ती पटण्यासारखी नाहीत त्यामुळे या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्यावतीने उपाध्यक्ष झिरवाळ यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती गटनेते अजय चौधरी यांनी दिली.एकनाथ शिंदे गटाचे याआधी 12 आमदार अपात्र ठरविण्यात यावे अशी याचिका दाखल करण्यात आली होती आणि आता यात मेहकरचे आमदार संजय रायमुलकर, नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर, वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे आणि एरंडोलचे आमदार चिमणराव पाटील या बंडखोर आमदारांची भर पडली आहे. या चार आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात याचिका दाखल केल्यामुळे एकनाथ शिंदे गटाच्या एकूण १६ आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार कायम आहे.त्यामुळे बंडखोरी केलेल्या आमदारांच्या अडचणीत भर पडली आहे.

Previous articleराजकारणाचे डावपेच चालतच राहतील,लोकांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्याने लक्ष द्या
Next articleमुख्यमंत्र्यांचा दणका : शिवसेनेचे पाच बंडखोर मंत्री आणि चार राज्यमंत्र्यांची खाती काढली