मुंबई नगरी टीम
मुंबई । विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राहुल नार्वेकर विजयी झाले.त्यांनतर त्यांच्या अभिनंदनाच्या भाषणात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी तुफान बॅटिंग करीत भाजप आणि शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना चिमटे काढले.देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केल्यावर भाजपाचे अनेक नेते ढसाढसा रडायला लागले.महाराष्ट्राला हा धक्का होता असे पवार म्हणताच सभागृहात हशा पिकला.
राज्यात सत्ता स्थापन करण्याचा दावा केल्यानंतर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी एकनाथ शिंदे घेतील आणि मी या मंत्रिमंडळाच्या बाहेर असेल असे सांगितल्यावर भाजपचे अनेक नेते ढसाढसा रडायला लागले असा चिमटा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपच्या नेत्यांना काढला.विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यावर त्यांच्या स्वागतपर भाषणात पवार यांनी तुफान बॅटिंग करीत भाजपसह शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना डिवचले.फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केल्यावर सर्वत्र शांतता पसरली.कुणालाच काही समजेना,भाजपचे नेते तर ढसाढसा रडत होते.गिरीश महाजनांच तर अजूनही रडणं बंद होईना.आज त्यांनी फेटा घातला होता.त्यांनी तो सोडून डोळ्यात आलेले पाणी पुसण्यासाठी त्यांनी फेट्याचा वापर केला.महाजनांना फडणवीस मुख्यमंत्री न झाल्याचे खूपच वाईट वाटले,अशी कोपरखळी त्यांनी महाजन यांना लगावली.
आज समोरच्या बाकाकडे पाहिले तर मूळचे भाजपचे कमी आणि आमच्याकडून गेलेले जास्त दिसत आहेत.आमच्याकडून गेलेले पदावर बसलेले बघून मला मूळच्या भाजपच्या नेत्याविषयी वाईट वाटतं असा चिमटाही त्यांनी काढला. पहिली रांगेकडे पाहिली तरी ते लक्षात येईल.गणेश नाईक,बबन पाचपुते,राधाकृष्ण विखे पाटील,उदय सामंत,गुलाबराव पाटील हे आमच्याकडून तिकडे गेलेले पहिल्या रांगेत बसलेत.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मागे दीपक केसरकर बसलेत.यावेळी अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनाही चिमटे काढले.चंद्रकांत पाटील यांनी बाकडं वाजवू नये.तुम्हाला मंत्रिपद मिळेल की नाही सांगता येत नाही.कुठं बाकडं वाजवताय ? शिवसेनेतून तिकडे गेलेल्या ३९ आमदारांपैकी किती लोकांना मंत्रिपद मिळणार आहे ? सगळ्यांना वाटतंय मिळेन पण काय होईल काही सांगता येत नाही असा टोलाही त्यांनी बंडखोर आमदारांना लगावला.