शिवसेनेच्या अस्तित्वाला आव्हान दिले असताना सेनेनी घेतलेली भूमिका अनाकलनीय : काँग्रेसची नाराजी

मुंबई नगरी टीम

मुंबई । राष्ट्रपतीपदाच्या भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा द्यावा अशी मागणी शिवसेनेच्या खासदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.त्यामुळे शिवसेना काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले होते.मात्र शिवसेना राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करीत असल्याची घोषणा आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.शिवसेनेने घेतलेली भूमिका अनाकलनीय आहे, अशा शब्दात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर काल झालेल्या शिवसेना खासदारांच्या बैठकीत अनेक खासदारांनी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा द्यावा अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.तर संजय राऊत यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी केली होती.खासदारांचा वाढता दबाव पाहता आज शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे.याची अधिकृत घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.पहिल्यांदा आदिवासी समाजातल्या व्यक्तीला राष्ट्रप्रमुख बनण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे आपण त्यांना पाठिंबा दिला तर आम्हाला त्याचा आनंद होईल असी विनंती आदिवासी समाजात काम करणा-या शिवसेनेच्या नेत्यांनी केल्याने या सगळ्यांचा मान ठेवून शिवसेना द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देत आहे, असे सांगतानाच कोणाच्या दबावाखाली पाठिंबा जाहीर केला नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेने घेतलेल्या या निर्णयाबद्दल काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे.राष्ट्रपतीपदाची निवडणूक ही वैचारिक लढाई आहे.लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी सुरू असलेला हा संघर्ष आहे.स्त्री, पुरुष किंवा आदिवासी,बिगर आदिवासी अशी ही लढाई नाही.जे संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणाच्या बाजूने आहेत ते सर्व यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देत आहेत.शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा का दिला ? त्यासाठी त्यांनी काही कारणही सांगितले,मात्र त्या पाठीमागील त्यांची खरी भूमिका काय ते शिवसेनेचे नेतृत्वच सांगू शकेल,त्याबद्दल आम्ही काय सांगणार ? शिवसेना हा एक वेगळा राजकीय पक्ष आहे, त्यामुळे ते त्यांची भूमिका घेऊ शकतात. मात्र या वैचारिक लढाईत जेव्हा गैर लोकशाही मार्गाचा अवलंब करून राज्यातील सरकार पाडले गेले,शिवसेनेच्या अस्तित्वाला आव्हान दिले गेले,अशा परिस्थितीत शिवसेनेने घेतलेली भूमिका अनाकलनीय आहे.शिवसेना महाविकास आघाडीत आहे, पण हा निर्णय घेताना त्यांनी आमच्याशी काहीही चर्चा केलेली नाही असे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

Previous articleजिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडत कार्यक्रमास स्थगिती
Next articleदीपक केसरकर तुमची लायकी काय आहे आम्हाला चांगले माहित आहे : राणेंचा हल्लाबोल