ठाकरे सरकारने स्थगिती दिलेल्या फडणवीसांच्या निर्णयाला शिंदेंचा हिरवा झेंडा

मुंबई नगरी टीम

मुंबई । देशात आणीबाणीच्या काळात बंदिवास सोसावा लागलेल्या व्यक्तिंना दरमहा १० हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय यापूर्वीच्या फडणवीस सरकारने घेतला होता.मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर या निर्णयाला स्थगिती दिली होती.अडीच वर्षानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होताच आणीबाणीमध्ये बंदिवास सोसावा लागलेल्या व्यक्तिंना १० हजार रुपयांचे मानधन देण्याचा निर्णय राज्यातील शिंदे सरकारने घेतला आहे.

आणीबाणीच्या काळात एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तींना दरमहा १० हजार रुपये व त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस,पतीस ५ हजार रुपये मानधन, तर एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तींना दरमहा ५ हजार रुपये तर त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस पतीस २ हजार ५०० रुपये मानधन देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला होता.मात्र हा निर्णय महाविकास आघाडी सरकारने रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणीबाणीमध्ये बंदिवास सोसावा लागलेल्या व्यक्तिंना पूर्वीप्रमाणेच मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.येत्या १ ऑगस्ट पासून हे मानधन अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Previous articleबाजार समितीच्या निवडणूकीमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार
Next articleभर पत्रकार परिषदेत फडणवीसांनी मुख्यमंत्री शिंदेंना कागदावर काय लिहून दिले ?