मुंबई नगरी टीम
मुंबई । मुख्यमंत्री शिंदे यांनी आज शिवसेनेच्या खासदारांची बैठक घेतल्याची चर्चा असतानाच ते आज रात्री ९ वाजता दिल्लीला रवाना झाले आहेत.शिवसेनेचे काही खासदार फुटणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर गेल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर आमदारांच्या अपात्रतेविषयी सुनावणी होणार असल्याने त्यांच्या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
आज राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडले.मतदान पार पडत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या काही खासदारांशी संवाद साधल्याची चर्चा आहे.मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेच्या खासदारांशी संपर्क साधल्यानंतर आमदारांपाठोपाठ खासदारही फुटणार असल्याची चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री शिंदे एक दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले.शिंदे -फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे. शिवाय येत्या २० जुलैला सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर आमदारांच्या अपात्रतेविषयी सुनावणी होणार आहे.या पार्श्वभूमीवर शिंदेंचा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.या दौऱ्यात ते शिंदे कोणाकोणाच्या भेटीगाठी घेतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.