रिक्षावाला,टपरीवाला,वॅाचमन,भाजीविक्रेत्यांसाठी शिंदे सरकार घेणार मोठा निर्णय

मुंबई नगरी टीम

मुंबई । शिवसेनेच्या ४० आमदारांनी शिवसेनेला’जय महाराष्ट्र’ करून एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिंदे गटात सामिल झालेल्या अनेक आमदारांवर शिवसेनेच्या नेत्यांनी खालच्या पातळीवर टीकास्त्र सोडले होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रिक्षावाला तर शिंदे गटाच्या अनेक आमदारांवर भाजीवाला,वॅाचमन,टपरीवाला आदी खालच्या भाषेत अवहेलना करण्यात आली होती.मात्र आता याच कष्टकरी घटकांसाठी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती माजी मंत्री आणि शिंदे गटाचे उपनेते उदय सामंत यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसात राज्यातील राजकारण मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली आहे.शिवसेनेतील ४० आमदारांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला.शिवसेनेत बंड झाल्याचे स्पष्ट होताच दुसरीकडे गुवाहटीत एकापाठोपाठ शिवसेनेचे आमदार शिंदे यांना साथ देण्यासाठी पोहचत होते.जेव्हा शिवसेनेत मोठी फुट पडल्याचे स्पष्ट झाले तेव्हा शिंदे यांच्या गटातील गुलाबराव पाटील,संदिपान भुमरे या मंत्र्यासह काही आमदारांवर शिवसेनेच्या नेत्यांकडून वैयक्तिक टीका करण्यात आली होती.शिंदे यांना रिक्षावाला,गुलाबराव पाटील यांना टपरीवाला,संदिपान भुमरे यांना वॅाचमन तर प्रकाश सुर्वे यांची भाजीवाला अशी अवहेलना करण्यात आली होती.गुवाहटी नाट्य संपुष्टात येताच राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले.नवे सरकार येताच शिंदे यांनी सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचा सपाटा लावला असतानाच आता ज्यांची रिक्षावाला,टपरीवाला,वॅाचमन आणि भाजीवाला अशी अवहेलना करण्यात आली अशा कष्टकरी वर्गासाठी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार लवकरच मोठा निर्णय घेवून दिलासा देण्याच्या तयारीत आहे.

राज्यात अंदाजे ८ लाख ३२ हजार रिक्षा तर ९० हजार टॅक्सी परवानाधारक आहेत.हा कष्टकरी वर्ग सामाजिक व कल्याणकारी योजनांपासून वंचित आहे.या रिक्षाचालक आणि टॅक्सी चालकांसाठी मगहाराष्ट्रात तामिळनाडू सरकारच्या धर्तीवर सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजना राबविण्याकरिता मंडळ स्थापन करण्याची मागणी रत्नागिरीचे आमदार आणि शिंदे गटाचे उपनेते उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.याबाबतचा निर्णय राज्य सरकार लवकरच घेवून या कष्टकरी जनतेला दिलासा देणार असल्याची माहिती आ.सामंत यांनी दिली.राज्यातील भाजी व्यावसायिकांना टोलमुक्ती देवून या वर्गाला मोठा दिलासा देण्याचा निर्णय शिंदे सरकार घेण्याच्या तयारीत आहे.तर सुरक्षारक्षक यांच्या वेतनाच मोठी वेतनवाढ करण्याबरोबरच त्यांना निवृत्तीवेतन देण्याचा मानस शिंदे सरकारचा आहे.देहविक्री व्यवसाय करणा-या महिलांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यासोबतच टपरीधारकांना शासकिय योजनांचा लाभ देण्याचा निर्णय शिंदे घेणार असल्याची माहितीही आ.सामंत यांनी दिली.

Previous articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर,शिवसेनेला अजून धक्के देण्याच्या तयारीत ?
Next articleमंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार ? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केला एका शब्दात फैसला