मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार ? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केला एका शब्दात फैसला

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यात शिंदे -फडणवीस सरकार येवून तीन आटवड्याच्या कालावधी उलटून गेला असला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये आज आमदारांच्या अपात्रसंदर्भात सर्वांचे लक्ष लागले होते.सर्वोच्च न्यायालयात झालेल्या युक्तिवादानंतर दोन्ही गटाला येत्या मंगळवारपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश खंडपीठाने दिले असताना आता शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होणार असा प्रश्न पडला आहे.यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका शब्दात मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होईल याचे उत्तर दिले आहे.

शिवसेनेच्या आमदारांनी बंड करीत शिंदे गटात सामिल होण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवसनेने १६ आमदारांना अपात्र करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात केली होती.याबाबत सर्वोच्च न्यायालयाने खंडपीठ नेमण्याचा निर्णय घेतला होता.भाजपच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात असल्याचे बहुमत सिद्ध करण्याची मागणी केली होती.राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देताच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.या घडामोडीनंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.विधानसभेत शिंदे-फडणवीस सरकारने बहुमत सिद्ध केल्यावर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाण्याची शक्यता होती.मात्र खंडपीठामध्ये होणा-या सुनावणीनंतरच विस्तार करण्याचा निर्णय शिंद आणि फडणवीस यांनी घेतला होता.आज याबाबतची सुनावणी पार पडली असून,युक्तिवादानंतर दोन्ही गटाला येत्या मंगळवारपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश खंडपीठाने दिले.

आजच्या सुनावणीनंतर पुन्हा एकदा मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होणार असा प्रश्न निर्माण झाला असतानाच मुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.विरोधी पक्षाने सरकारविरोधात जे प्रयत्न केले,त्याला न्यायालयाने कोणत्याही प्रकारचा दिलासा दिलेला नाही.सरकार स्थापन करण्यापासून,विश्वासदर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्षांच्या निवडीपर्यंत, आमच्या सरकारने जे काही केले आहे ते कायदेशीररित्या केले असल्याचे सांगून, विस्ताराबाबत न्यायालयाची कोणतीही अडचण नसून राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल,असे एका वाक्यात त्यांनी विस्तारावर उत्तर दिले.विस्ताराबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी जे उत्तर दिले तेच उत्तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी देवून विस्ताराबाबत स्पष्ट उत्तर देण्याचे टाळले.

Previous articleरिक्षावाला,टपरीवाला,वॅाचमन,भाजीविक्रेत्यांसाठी शिंदे सरकार घेणार मोठा निर्णय
Next articleओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून भाजप आणि महाविकास आघाडीत श्रेयवादाची लढाई