मी अडीच वर्षे मुख्यमंत्री होतो पण मला सत्तेची चटक नाही लागली : उद्धव ठाकरे गरजले

मुंबई नगरी टीम

मुंबई । शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेत मोठी पडझड झाली आहे.आमदारांच्या पाठोपाठ खासदारांनीही शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.या सर्व पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली असून,या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.गेली अडीच वर्षे मी मुख्यमंत्री होतो पण मला सत्तेची चटक नाही लागली अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड करीत शिंदे गटात सामिल होण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनेपुढे अस्तित्वाचा प्रश्न उभा ठाकला आहे.राज्यात शिंदे सरकार आल्यावर शिंदे यांच्याकडून शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.खरी शिवसेना कुणाची हा वाद न्यायालयात पोहचला असतानाच गेल्या महिनाभरात राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली असून ती उद्या २६ जुलै आणि २७ जुलै रोजी दोन भागात प्रसारीत करण्यात येणार आहे.या मुलाखतीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदार,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे.कुणाचे आयुष्य बरबाद करून तुम्हाला सुख लाभत असेल असे मला वाटत नाही.कुणाला मुख्यमंत्रिपद हवे होते,या रहस्यामध्येच उत्तर आहे.पण,माझ्याच लोकांनी मला दगा दिला, असेही त्यांनी या मुलाखतीत ठणकावले आहे. हम दो एक कमरे में बंद हैं और चावी खो जाय, असे हे सरकार आहे,अशा त्यांनी शिंदे आणि फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.मुख्यमंत्रिपद सोडण्यासाठी माझ्या मनात काही पाप नव्हतं. मी अडीच वर्षे मुख्यमंत्री होतो पण मला सत्तेची चटक लागली नाही असा टोलाही त्यांनी शिंदे यांना लगावला आहे.मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवले, असे वचन दिले होते, ते वचन पूर्ण केले आहे, आता वचन पूर्ण केले म्हणून दुकान बंद करून बसणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

बंडखोरांच्या कपाळावर जो विश्वासघाताचा शिक्का लागलाय तो पुसता येणार नाही,अशा शब्दात त्यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर हल्ला चढवला आहे.आमदारांनी बंड केल्यावर उद्धव ठाकरे स्वत: सुरतला गेले असते तर ? निवडणूक आयोगापुढे एक नवीन खटला उभा राहत आहे, धनुष्यबाण कुणाचा ? ठाकरेंना पुरावे द्यावे लागत आहेत शिवसेना खरी किंवा खोटी,आज जी फूट दिसतेय शिवसेनेत,याआधी राणे, भुजबळांनाही पाडता आली नव्हती,नक्की काय चुकलं असावं आपलं, की महाविकास आघाडीचा प्रयोगच चुकला ? असे अनेक प्रश्न राऊत यांनी या मुलाखतीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारले आहेत.राऊतांच्या सर्वच प्रश्नांना ठाकरे यांनी तेवढ्याच जोमात आणि ठाकरे शैलीत उत्तरं दिली आहेत.

Previous articleखुशखबर : राज्यात दोन वर्षानंतर गणेशोत्सव दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरे होणार
Next articleदिल्लीतून हिरवा झेंडा मिळत नाही तोपर्यंत हे दोघे काय करतील असे वाटत नाही !