असंगाशी संग करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री होणं बरं ; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई नगरी टीम

मुंबई । असंगाशी संग करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री होणे बरे,असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला.विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी आपल्या भाषणात विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. होय,मी महाराष्ट्र विकासाचे,राज्य अधिक समृद्ध करण्याचे,गोरगरिबांचे अश्रू पुसण्याचे,बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचे,आणि बहुजनांचा सर्वांगीण विकास करण्याचे कंत्राट घेतले आहे,अशी टोलेबाजी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका करताना त्यांचा उल्लेख कंत्राटी मुख्यमंत्री असा केला होता.आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाकरे आणि विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.असंगाशी संग करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री होणे बरे,असा टोला त्यांनी यावेळी लगावला.होय,मी महाराष्ट्र विकासाचे,राज्य अधिक समृद्ध करण्याचे,गोरगरिबांचे अश्रू पुसण्याचे,बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचे,आणि बहुजनांचा सर्वांगीण विकास करण्याचे कंत्राट घेतले आहे अशी टोलेबाजीही त्यांनी केली.आमच्या सरकारकडे बहुमत असून,आम्हाला भाडोत्री फौजफाट्याची गरज नाही अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा डंका जगात गाजविला,यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाणे नाही या बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी आम्ही भाजपसोबत आहोत असेही त्यांनी सांगितले.नीती आयोग बैठकीला आपण उपस्थित होतो.पण फोटोच्या समयी तिसऱ्या रांगेत उभे राहण्यावरून टीका झाली.पण आमच्यासाठी रांग महत्वाची नाही,काम महत्त्वाचे आहे असेही ते म्हणाले.नीती आयोग बैठकीनंतर राज्यासाठी हजार कोटी देण्याचे आश्वासन मिळाले, शिक्षण, आरोग्य, विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी दिली आहे,असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.देशाला महासत्ता बनविण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत, तुमचा विरोध आहे का,असा खोचक सवालही मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाला गेलो असताना पहिल्या रांगेत होतो,त्याबद्दल कोणी काही बोलले नाही.मी इंदिरा गांधी यांचा चाहता होतो, त्यांनी मोठे काम केले.पण आताच्या पंतप्रधानांनी देशाचा डंका जगभरात बजावला.मग अशा माणसाला भेटायला जायचे तर रांग का बघायची ? असा सवालही त्यांनी केला.

विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस हे एकटे सर्वांना पुरुन उरायचे. फडणवीस हे मी पुन्हा येईन असे म्हणायचे आणि ते पुन्हा आले आणि ते मलासुद्धा घेऊन आले.आता तर आम्ही दोघे आहोत, ‘एक से भले दो’ असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.विरोधी पक्षातील सदस्यांनी सरकारने काय केलं पाहिजे हे अंतिम आठवडा प्रस्तावात मांडायला हवे.विरोधी पक्षनेते अजित पवार हे रोखठोक बोलतात.आम्ही शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत पाच हजारावरून 15 हजार केली असेही त्यांनी सांगितले.विरोधी पक्षाने वातावरण हे हलके फुलके करायचे असते, पण तुम्ही आम्हाला बोचंल असे बोलत होता असे खडेबोल त्यांनी विरोधकांना सुनावले.मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात जयंत पाटील यांचीही फिरकी घेतली.जयंत पाटील हे आपल्या भाषणावेळी राष्ट्रीय प्रवक्त्यासारखे बोलत होते. असे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की,खरे तर जयंत पाटील यांनाच विरोधी पक्षनेता व्हायचे होते. पण त्यांना ते होता आले नाही, विरोधी पक्षनेतेपद हे अजित पवार यांना देण्यात आले.असे सांगून,या ठिकाणी दादांची दादागिरी चालणारच. ते आमचे मित्र आहेत असेही मुख्यमंत्री म्हणाले.आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली नाही.काँग्रेसला जवळ करायचे नाही, त्यांना जर कधी जवळ करायची वेळ आली तर मी माझे दुकान बंद करेन असे बाळासाहेबांनी म्हटले होते.त्यामुळे आम्ही त्यांचे विचार पुढे घेऊन चाललो आहोत. आम्ही गद्दार असतो तर आमच्या स्वागतासाठी एवढी मोठी गर्दी झाली असती का ? असा सवालही त्यांनी विरोधकांना केला.

Previous articleगिरणी कामगारांना ५० हजार तर सफाई कर्मचा-यांना २९ हजार घरे देणार; पोलीसांना २५ लाखात घरं
Next articleराज्यात ७५ हजार नोकर भरती करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा