मुंबई नगरी टीम
मुंबई । शिवसेनेला कधीही मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला नव्हता.२०१४ मध्ये शिवसेनेने केवळ दोन जागांसाठी युती मोडली.निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने मतं मागून जिंकून आल्यावर विश्वासघात केला असे सांगतानाच आता उद्धव ठाकरे यांना जमीन दाखवण्याची वेळ आली आहे,असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला.मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पदाधिका-यांच्या मेळाव्यात त्यांनी आज निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौ-यावर होते. त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईतील अनेक गणेश मंडळांना भेटी देवून गणेशाचे दर्शन घेतले. त्यांनतर मेघदूत या शासकीय निवासस्थानी झालेल्या भाजपच्या पदाधिकारी मेळाव्यात मार्गदर्शन करताना त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर निशाणा साधला.त्यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करीत त्यांनी भाजपला धोका दिल्याचा आरोप केला.शिवसेनेने २०१४ मध्ये केवळ दोन जागांसाठी युती मोडली असल्याचे सांगत,पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने मतं मागितली मात्र जिंकून आल्यावर त्यांनी भाजपचा विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला. शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचा शब्द कधीच दिला नव्हता असे स्पष्ट करून आता उद्धव ठाकरे यांना जमीन दाखवण्याची वेळ आली असल्याचा घणाघातही त्यांनी आपल्या भाषणात केला.जे धोका देतात त्यांना योग्य शिक्षा झाली पाहिजे असेही शहा यावेळी म्हणाले.मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या मेळाव्यात त्यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले.मुंबई महानगरपालिका निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्त्याने जमीनीवर उतरुन काम केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शिवसेनेने भाजपशी युती तोडली तेव्हा खयाली पुलाव पकवक होते.त्यांना वाटले भाजप युती तोडणार नाही.आपल्या शिवाय भाजपचे काय होणार,आपल्याच जास्त जागा निवडून येतील असा त्यांचा समज होता मात्र तो चुकीचा ठरला असेही शहा यावेळी म्हणाले.राजकारणात काहीही सहन करा,पण धोका सहन करू नका असेही त्यांनी भाजपच्या पदाधिका-यांना सांगितले.जे धोका देतात त्यांना योग्य शिक्षा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मैदानात उतरले पाहिजे असेही त्यांनी आवाहन केले. महाराष्ट्रातले हिंदुविरोधी राजकारण संपवायचे आहे, असे सांगून आमच्या नावाने मतं मागितली आणि जिंकल्यावर विश्वासघात केला मात्र तुमचा पक्ष छोटा झाला त्याला तुम्हीच जबाबदार आहात असेही त्यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावले.
अभी नही तो कभी नही…फडणवीस
अभी नही तो कभी नही, अशा आवेशात लढा.आता एकच लक्ष मुंबई महानगरपालिका, असा कानमंत्र यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात दिला.मुंबई महानगरपालिकेवर भाजपचाच झेंडा फडकणार असल्याचा दावाही त्यांनी केला.मुंबईत खरी शिवसेना आमच्या सोबत आहे.सध्या सगळीकडे भाजपचाच बोलबाला आहे. शिवसेना राजकारण करीत असेल तर त्यांना आपण मागे टाकू.मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही जावनातील शेवटची निवडणूक आहे असे समजून लढा.आता केवळ एकच लक्ष मुंबई महानगरपालिका आहे असेही फडणवीस म्हणाले.वॉर्ड रचना आणि प्रभाग रचना याचा विचार करुन चालणार नाही तर पदाधिकाऱ्यांनी काम करत रहायला हवे.मुंबई महानगरपालिकेत सत्ताधारी शिवसेनेवर जनतेचा रोष आहे त्यामुळे सर्वांनी जोरदार तयारी करायची आहे असेही फडणवीस यांनी सांगितले.