मुंबई नगरी टीम
मुंबई । एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा आणि शिवसंवाद यात्रेच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला असतानाच दस-या नंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत.तर उद्धव ठाकरे यांच्या यात्रेपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंदू गर्व गर्जना संपर्क यात्रा काढून राज्यातील जिल्हे ढवळून काढणार आहेत.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या यात्रेपूर्वीच मुख्यमंत्री शिंदे यांनी हिंदु गर्व गर्जना संपर्क यात्रा काढण्याचा निर्णय घेवून शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने संभाव्य पडझड सावरण्यासाठी युवा सेनेचे अध्यक्ष यांनी मुंबईत निष्ठा तर राज्यात शिवसंवाद यात्रा काढून शिंदे गटावर हल्लाबोल केला होता.या दौ-यात आदित्य ठाकरे यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला.येत्या १६ सप्टेंबर रोजी ते रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.रत्नागिरी चिपळूण आणि दापोली या ठिकाणी त्यांच्या सभा होणार आहेत.त्यांच्या या झंझावाती दौ-यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दस-या नंतर राज्याचा दौरा करणार आहेत.त्यांच्या या दौ-याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू केली आहे.उद्धव ठाकरे यांच्या ‘महाप्रबोधन यात्रेचा प्रारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातून म्हणजेच टेंभी नाक्यावरून होणार आहे.तर सांगता कोल्हापुरातील बिंदू चौकात होणार आहे.महाराष्ट्राच्या सर्वच्या सर्व ४८लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची ‘महाप्रबोधन यात्रा’ जाणार आहे. मुख्यमंत्रिपदावर असताना महाराष्ट्रासाठी कोणकोणती कामे केली, कोरोना काळात ठाकरे सरकारने केलेली कामे यांच्यासह उद्धव ठाकरे आपल्या सभातून बंडखोरांवर आसूड ओढण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे यांची महाप्रबोधन यात्रा सुरू होण्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हिंदू गर्व गर्जना संपर्क यात्रा सुरू होणार आहे. २० ते ३० सप्टेंबर दरम्यान मुख्यमंत्र्याची संपर्क यात्रा सुरू होणार आहे.याचे नियोजन करण्यासाठी काल मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक पार पडली.या बैठकीला खासदार,मंत्री, आमदार आणि जिल्हा प्रमुख उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांची संपर्क यात्रा यशस्वी करण्याची जबाबदारी मंत्री,उपनेते आमदार आणि जिल्हा प्रमुखांवर सोपविण्यात आली आहे. १० दिवसांच्या संपर्क यात्रेदरम्यान मुख्यमंत्री राज्यातील सर्वच जिल्ह्यात जनतेशी संपर्क साधणार आहेत.या संपर्क यात्रेत होणा-या सभामधून मुख्यमंत्री शिंदे हे शिवसेनेला आणि उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्याची शक्यता आहे.तसेच बंड केल्यापाठीमागची भूमिका मांडणार असल्याचे समजते.मुख्यमंत्र्यांच्या दौ-यापूर्वी आढावा घेण्यासाठी संबंधित मंत्री,उपनेते, संबंधित जिल्ह्याचे प्रमुख हे जिल्ह्यात दोन दिवसांचा दौरा करणार आहेत.या संपर्क यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या महाप्रबोधन’ यात्रेपूर्वी हिंदू गर्व गर्जना संपर्क यात्रा काढण्याचा निर्णय घेत कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या संपर्क यात्रेनिमित्ताने पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.