मुख्यमंत्री अधिक गतीने धावत आहेत,दुसरं काही दिसलं नाही : शरद पवारांचा एकनाथ शिंदेंना टोला

मुंबई नगरी टीम

पुणे । उध्दव ठाकरे यांच्या सरकारमध्ये उदय सामंत आणि एकनाथ शिंदे हे मंत्री होते हे दोघे ज्या मंत्रीमंडळात होते त्या मंत्रीमंडळाने निर्णय घेतला आता तेच आरोप करत आहेत हे शहाणपणाचे लक्षण नाही अशा शब्दात वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याने सुरू असलेल्या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांसह सरकारमधील मंत्र्यांचे कान टोचतानाच नवीन सरकारचा कारभार अजून दिसला नाही पण गतीमान राज्य आहे हे दिसतंय कारण राज्याचे प्रमुख अधिक गतीने धावत आहेत आणि राज्य समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत याशिवाय दुसरं काही दिसलं नाही अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची येथे पत्रकार परिषद झाली यावेळी त्यांनी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून सरकारवर निशाणा साधत राज्याचा विकासासाचा गाढा हाकताना राज्यकर्त्यांनी काय भूमिका घ्याव्यात याचा सल्लाही सरकारला दिला.वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प तळेगावमध्ये येणार होता त्याची तयारी झाली होती. मागील राज्यसरकारने जी काही आवश्यक त्या निर्णयाची तयारी ठेवली होती. महाराष्ट्रातून हा प्रकल्प बाहेर जायला नको होता पण गेला तर त्यावर चर्चा नको असेही त्यांनी स्पष्ट केले.या प्रकल्पामध्ये पंतप्रधान लक्ष घालत आहेत.यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देऊ सांगणे म्हणजे लहान मुलांची समजूत काढावी अशा प्रकारची समजूत काढली आहे असा टोला लगावतानाच यात महाराष्ट्राची प्रतिष्ठा नाही त्यामुळे यावर आता चर्चा नको असेही पवार म्हणाले.या प्रकल्पासाठी तळेगावातील जागा योग्य होती.आजुबाजुला चाकण हा ऑटोमोबाईलच्यादृष्टीने महत्त्वाचा भाग आहे.चाकण,रांजणगाव हा परिसर ऑटोमोबाईलचा कॉरिडॉर करण्याचा प्रयत्न मी सत्तेत असताना झाला.आणि त्याठिकाणी चांगल्या कंपन्या आल्या.त्यामुळे तो महत्वाचा भाग झाला होता असेही पवार म्हणाले.

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प तळेगावात झाला असता तर त्या कंपनीला सोयीचे झाले असते. याबाबत अग्रवाल यांनी निर्णय घेतला आहे तो त्यांचा अधिकार आहे.यामध्ये नवीन नाही.एक महत्त्वाचा प्रकल्प रत्नागिरीत करायचा निर्णय झाला होता तोही वेदांत ग्रुपचा होता नंतर तो प्रकल्प चेन्नईला नेला ही जुनी गोष्ट आहे त्यामुळे वेदांत ग्रुपकडून ही पहिलीच गोष्ट झालेली नाही. वेदांतचा प्रकल्प येत असेल तर तो शेवटपर्यंत येईल की नाही याची खात्री नाही अशी स्पष्ट भूमिका पवार यांनी मांडून हे व्हायला नको होते परंतु आता झालंय ते झालंय त्यावर चर्चा बंद करून नवीन काय येईल यावर विचार करा असे असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी बोलताना पवार यांनी एनरॉन प्रकल्पाचा किस्सा सांगताना हा प्रकल्प अरबी समुद्रात बुडवण्याची घोषणा केली होती मात्र त्यानंतर त्यांची सत्ता आल्यावर त्यांनी त्याच प्रकल्पाचा राज्याच्या हितासाठी होता म्हणून भूमिपूजन केले असेही त्यांनी स्पष्ट केले.गुंतवणूकदाराच्यामध्ये महाराष्ट्र हा प्रथम क्रमांकावर होता.त्यानंतर कर्नाटक,गुजरात असायचा.महाराष्ट्रातील सत्ताधारी सर्व कामांना प्रोत्साहित करायची.गुंतवणुकीसाठी एक चांगलं वातावरण राज्याला निर्माण करावं लागतं.महाराष्ट्राचं आतापर्यंतचं वैशिष्ट्य होतं आता त्याच्यामध्ये लोकांचे लक्ष आहे की नाही याबाबत पवार यांनी शंका व्यक्त केली.

आज काल बातम्यामध्ये काय झाडी काय डोंगर आणि वगैरे वगैरे दिसत आहे. अशा सगळ्या गोष्टी एखाद्यावेळी ठिक आहे परंतु रोजच अशा गोष्टी नकोत.राज्याच्या प्रमुखाने आणि राज्यकर्त्यांनी राज्याच्या विकासाचा विषय मांडायचा असतो मात्र सध्या एकमेकांचे वाद सातत्याने काढले जात आहेत असे सांगून दोन्ही बाजूने दुषणं द्यायची,वाद करायचे या गोष्टी बंद केल्या पाहिजेत अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.सर्वांनी महाराष्ट्रामध्ये वातावरण कसे सुधारेल, विकासाच्यादृष्टीने कसे पुढे जावू याच्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे टिका करा पण दोष देत बसू नका.एक दिवस दोन दिवस टिका ठिक आहे यापेक्षा नवीन प्रकल्प कसे येतील यावर लक्ष केंद्रित करण्याचा मोलाचा सल्ला पवार यांनी दिला.पवार यांनी यावेळी हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात येण्याबाबत शंका उपस्थित करून राज्यात नवीन प्रकल्प आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.त्यांनी उद्योजकांशी संपर्क साधून प्रयत्न केल्यास ते सहकार्य करतील असेही पवार म्हणाले.सत्तेत असताना रोज मंत्रालयात देशातील व देशाबाहेरील गुंतवणूकदार यायचे त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी दोन तास त्यांना द्यायला लागायचे असे महाराष्ट्राचे ‘गुंतवणूकीचे वातावरण ‘ होते असा किस्सा सांगताना आज ते वातावरण निर्माण करुया व वाद थांबवुया असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.या नवीन सरकारचा मला अजून कारभार दिसला नाही पण गतीमान राज्य आहे हे दिसतंय कारण राज्याचे प्रमुख अधिक गतीने धावत आहेत आणि राज्य समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत याशिवाय दुसरं काही दिसलं नाही अशी खोचक टीकाही पवार यांनी यावेळी केली.

Previous articleउद्धव ठाकरेंच्या ‘महाप्रबोधन’ यात्रेपूर्वीच एकनाथ शिंदेंची ‘हिंदू गर्व गर्जना’ यात्रा
Next article…आणि नाराज छत्रपती संभाजीराजेंना मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी सह्याद्रीवर बोलावले !