मुंबई नगरी टीम
ठाणे । राष्ट्रवादीचे युवा नेते रवीकांत वर्पे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून कामकाज करीत असल्याचा यांचा एक फोटो शेअर केल्याने अनेक उलटसुलट चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावर स्पष्टीकरण देत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच लक्ष्य केले आहे.
रवीकांत वर्पे यांनी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत त्यांचे खासदार पुत्र बसल्याचा एक फोटो ट्विटरवर शेअर करीत खा.श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा.मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात.लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरूय.हा कोणता राजधर्म आहे ? असा कसा हा धर्मवीर ? असा सवाल उपस्थित केला.त्यांनी शेअर केलेला फोटो चांगलाच व्हायरल झाला.त्यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण देण्यासाठी तातडीचे पत्रकार परिषद बोलावली.खा. शिंदे यांच्यावर राष्ट्रवादीने आरोप केला होता.मात्र या पत्रकार परिषदेत खा. शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला.माझ्यावर करण्यात आलेली टीकाही हास्यास्पद आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १८-१८ तास काम करतात.ते सक्षम मुख्यमंत्री असून,ज्या कार्यालयाचा फोटो व्हायरल करण्यात आला आहे तो ठाण्यातील कार्यालयाचा असल्याचे त्यांनी सांगितले.या कार्यालयातून मी आणि मुख्यमंत्री काम करतात.
जो फोटो व्हायरल होत आहे तो वर्षा निवासस्थान किंवा मंत्रालयातील कार्यालयातील नाही.त्यामुळे हे केवळ बदनामी करण्याचा करण्याचे काम आहे.मुख्यमंत्र्यांच्या एका पत्रकार परिषदेसाठी तात्पुरता तयार करण्यात आलेला बोर्ड असून,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकाच ठिकाणी बसून काम करणारे मुख्यमंत्री नाहीत तर त्यांना वेळ मिळेल त्या ठिकाणाहून ते शासकीय काम करीत असतात असे सांगतानाच यापूर्वीचा अनुभव वेगळा होता ते कारभार एकाच ठिकाणाहून करीत होते अशा शब्दात त्यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.