मुंबई नगरी टीम
मुंबई । अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.या पोटनिवडणुकीसाठी ३ नोव्हेंबरला मतदान होणार असून,६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.शिवसेना फुटीनंतर होणा-या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच शिवसेना विरूद्ध भाजप आणि शिंदे गट असा सामना रंगणार असल्याने या पोटनिवडणुकीला महत्व प्राप्त झाले आहे.तर या पोटनिवडणूकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे.
शिवसेनेचे अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार रमेश लटके यांचे १२ मे रोजी दुबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी येत्या ३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणुक होत आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने आज निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.या निवडणुकीची अधिसूचना येत्या ७ ऑक्टोंबर रोजी जारी करण्यात येणार आहे तर १४ ऑक्टोंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून,१७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येऊ शकेल.या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेने रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली आहे.भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे.शिवसेनेच्या फुटीनंतर या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना भाजप आमने सामने येणार आहेत.
राष्ट्रवादीचा शिवसेनेला पाठिंबा
शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना विरूद्ध भाजप,शिंदे गट असा सामना रंगणार आहे.मोठ्या प्रमाणात झालेल्या बंडखोरीमुळे कमकुवत झालेल्या शिवसेनेपुढे भाजप आणि शिंदे गटाचे मोठे आव्हान असणार आहे.तर या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला.याची घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.