मुंबई नगरी टीम
मुंबई । युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातून बाहेर जात असलेल्या उद्योगांबाबत पत्रकार परिषद घेत पुराव्यांसह शिंदे-फडणवीस सरकारचे वाभाडे काढले.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योग विभागाबाबत पत्रकार परिषद घेतली.त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या आरोपाला पुराव्यांसह सडेतोड उत्तर दिले.खरं तर उत्तर मुख्यमंत्र्यांनी यावर उत्तर देणं अपेक्षित होतं. स्क्रिप्ट वाचून दाखवली तरी चालेल, असा टोलाही यावेळी आदित्य ठाकरे यांनी लगावला.उद्योग गुंतवणुकीवर मुख्यमंत्र्यांनी समोरासमोर चर्चेला यावं, असं खुलं आव्हान देखिल आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.
आदित्य ठाकरे म्हणाले, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,केंद्र सरकारने दोन हजार कोटींचा इलेक्ट्रॉनिक हब उद्योग उभारला आहे.वेदांत, फॉक्सकॉन प्रकल्पापेक्षाही मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आणू, असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. पण दीड लाख कोटींपेक्षा मोठा प्रकल्प दोन हजार कोटींचा असतो हे मला माहीत नाही, असा उपहासात्मक टोला लगावला.आदित्य ठाकरे यांनी पुढे फडणवीस यांचे आरोप खोडून काढला.उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करू नका, फॉक्सकॉनचा पहिला प्रकल्प वेगळा होता, महाराष्ट्रात खोटे बोलण्याचा प्रयत्न होत आहे, अशी सडकून टीका आदित्य ठाकरे यांनी केली.टाटा एअर बस प्रकल्पात सरकारचे म्हणणे आहे की, टाटाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील वातावरण चांगले नव्हते, त्यामुळे गुंतवणूक निघाली. तर फडणवीस यांनी त्या अधिकाऱ्याचे नाव सांगा.केवळ उद्योगमंत्र्यांशीच नव्हे, तर नितीन गडकरीजींनीही या प्रकरणी पत्रव्यवहार केला आहे, सरकारनेही पत्रव्यवहार केला आहे. राज्य सरकार आपल्या उणिवा झाकण्यासाठी केंद्र सरकारकडे हात दाखवत आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांचा अपमान केला.याशिवाय, नोकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या तरुणांना शेम्बडी पोरं म्हटलं, हे अत्यंत चुकीचं आहे. उपमुख्यमंत्री यांनी शब्द मागे घ्यावे आणि माफी मागावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.