मुंबई नगरी टीम
नागपूर । शिंदे-फडवीस सरकार आल्यापासूनच वादग्रस्त विधाने केल्यामुळे वारंवार वादाच्या भोवऱ्यात सापडलेले शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर आरोपांचा भडिमार करीत अत्यंत आक्रमकपणे महाविकास आघाडीने लक्ष्य केले.या प्रकरणी विरोधकांनी सरकारची कोंडी केली.कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिडशे कोटी किंमतीची गायरान जमीन बेकायदेशीररित्या एका व्यक्तीला दिल्याचा सनसनाटी आरोप आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केला.या प्रकरणी मंत्री सत्तार यांचा तात्काळ राजिनामा घ्या अशी मागणीही त्यांनी केली.या मुद्यावरून विरोधाकांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत ठाण मांडून प्रचंड गदारोळ सुरू केल्याने सभागृहाचे कामकाज तीनदा तहकूब करावे लागले.
प्रश्नोत्तर तासानंतर स्थगन प्रस्ताव विचारात घेण्याच्या वेळात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माजी राज्यमंत्री आणि विद्यमान कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी योगेश खंदारे या व्यक्तीला सदर वाशिम जिल्ह्यातील ३७ एकर गायरान जमीन देताना सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेला निर्णय व सूचनांचे उल्लंघन केले याकडे लक्ष वेधले.सिल्लोड येथील खासगीरित्या आयोजित कृषी महोत्सवासाठी, शासकीय यंत्रणा राबविणे आणि अयोग्य पद्धतीने पैसे वसूल केल्याचे दुसरे प्रकरण अजित पवार यांनी उघड केले.कृषीवस्तू विक्री दुकानांतूनही सक्तिने वसुली होत असल्याचा आरोप पवार यांनी केला.मंत्री सत्तार यांनी महिला खासदारांविषयीही अनुद्गार काढले आहेत. या घोटाळ्याप्रकरणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेऊन त्यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करावी अशी जोरदार मागणी अजित पवार यांनी केली. सत्तार त्यांनी राजिनामा न दिल्यास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनीच सत्तार यांच्या राजीनाम्याचा ठराव मांडावा असा आग्रही त्यांनी धरला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले,याविषयी माहिती घेऊन निर्णय घेण्यात येईल.कोणत्याही चुकीच्या गोष्टीला पाठीशी घातले जाणार नाही. मात्र या उत्तराने संतप्त विरोधी सदस्यांचे समाधान झाले नाही.त्यांनी गदारोळ करीत अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत ठाण मांडले आणि भजन म्हणत टाळ्या वाजवून मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाईची मागणी लावून धरली.सभागृहाचे कामकाज वारंवार तहकूब होत राहिले, अखेर गोंधळ वाढत गेल्याने सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.