मुंबई नगरी टीम
मुंबई । शिवसेनेने ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) शिंदे गटात सामिल झालेल्या १६ आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली होती.विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबाबत योग्य वेळेत निर्णय घ्यावा,असे सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटले आहे.मात्र सर्व बाजूंचा विचार केला तर शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ठरू शकतात असे वक्तव्य उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.आमदार अपात्रतेबाबात निर्णय घेण्याचा शेवटचा अधिकार हा विधानसभेच्या अध्यक्षांचा आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेच्या मागणीवर योग्य वेळेत निर्णय घ्यावा,असे सर्वोच्च न्यायालायने ११ मे २०२३ च्या निकालात म्हटले आहे. न्यायालयाच्या निकालाला पुढील महिन्यात १० ऑगस्ट रोजी तीन महिने पूर्ण होतील.तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ७ जुलैला शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या ५३ आमदारांना अपात्रतेबाबत आपले म्हणणे मांडण्यासाठी नोटीसा दिल्या आहेत. या आमदारांना आपले म्हणणे मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर प्रत्येक आमदाराला वेळ देऊन प्रत्यक्ष सुनावणी घेणार असल्याचे नार्वेकर यांनी म्हटले आहे.आमदार अपात्रतेच्या संदर्भात किती दिवसात निर्णय घ्यावा याबाबत माझ्यावर कुणीही बंधन घालू शकत नाही,असा असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अपात्रतेबाबत मी निर्णय दिल्यानंतरच संबंधिताना न्यायालयात जाता येईल असेही नार्वेकर यांनी सांगितले आहे.
दरम्यान उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आज आमदार अपात्रतेसंदर्भात एक वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे.सर्व बाजूंचा विचार केला तर शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ठरू शकतात.पण त्याबाबत निर्णय घेण्याचा शेवटचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा आहे असे वक्तव्य नरहरी झिरवळ यांनी केल्याने शिंदे गटाच्या आमदारांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.आमदार अपात्रतेचा निर्णय किती वेळात होईल हे महत्वाचे नाही.पण कधी ना कधी त्याबाबत निर्णय होणारच,असेही नरहरी झिरवळ म्हणाले.
ते १६ आमदार कोण ?
१) एकनाथ शिंदे
२) अब्दुल सत्तार
३) तानाजी सावंत
४) यामिनी जाधव
५) संदिपान भुमरे
६) भरत गोगावले
७) संजय शिरसाट
८) लता सोनावणे
९) प्रकाश सुर्वे
१०) बालाजी किणीकर
११) बालाजी कल्याणकर
१२) अनिल बाबर
१३) संजय रायमूलकर
१४) रमेश बोरनारे
१५) चिमणराव पाटील
१६) महेश शिंदे