आरे पुल १५ जानेवारीपासून वाहतुकीसाठी खुला होणार

आरे पुल १५ जानेवारीपासून वाहतुकीसाठी खुला होणार

जोगेश्‍वरी विक्रोळी लिंक रोडवरील अनधिकृत गॅरेजेस हटविणार

मुंबई :  जोगेश्‍वरी विक्रोळी लिंक रोड तसेच पश्‍चिम द्रुतगती मार्गावरील वाहतुकीच्या कोंडीवर जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी बोलविलेल्या संयुक्त बैठकीत तोडगा काढण्यात आल्याने वाहनचालकांची तसेच रहिवाशांची लवकरच सुटका होणार आहे. यावेळी आरेतील कोसळलेला पुल नव्याने बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून हा पुल १५ जानेवारी २०१८ पर्यंत वाहतुकीसाठी खुल करण्यात येईल, असे आश्‍वासन महापालिकेच्यावतीने वायकर यांना देण्यात आले आहे.

जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील वाढत्या वाहतुक कोंडीमुळे या मार्गावर जाणारे  वाहनचालक तसेच रहिवाशी मेटाकुटीला आले आहेत. आरेतील पुल कोसळल्याने जोगेश्‍वरी विक्रोळी लिंक रोडवरील वाहतुकीत वाढ झाली आहे. वाढत्या वाहतुक समस्येवर मार्ग काढण्यासाठी जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी शुक्रवारी जोगेश्‍वरी वाहतुक विभाग कार्यालयात तातडीची बैठक घेतली. या बैठकीला सह पोलीस आयुक्त (वाहतुक) अमितेश कुमार, पोलिस उपायुक्त (वाहतुक) संजय जाधव, परिमंडळ १० चे उपायुक्त नविनचंद्र रेड्डी, उपायुक्त सौरभ त्रिपाठी, एसीपी मिलिंद खेतले, नगरसेवक बाळा नर, प्रविण शिंदे, रेखा रामवंशी, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, मेट्रो, महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी वाहतुक विभागाचे सह पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पश्‍चिम द्रुतगती महामार्गावरील जोगेश्‍वरी-विक्रोळी लिंक रोडच्या जंक्शनवरील सर्व खड्डे तातडीने बुजविण्यात यावे, अशी सुचना करताच एमएमआरडीएच्या अधिकारी देढे यांनी ७ दिवसांमध्ये हे खड्डे बुजविण्यात येतील, असे आश्‍वासन दिले. त्याचबरोबर जोपर्यंत द्रुतगती मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे, तोपर्यंत नेस्कोमध्ये विकएन्ड पर्यंत ५० टक्क्यांपेक्षा जास्त एरियामध्ये प्रदर्शन भरविण्यात येऊ नये, असे पत्र नेस्कोच्या  व्यवस्थापनाला देण्यात आल्याची माहिती अमितेेश कुमार यांनी राज्यमंत्री वायकर यांना दिली. त्याचबरोबर नेस्कोच्या ज्या जागांमध्ये पार्किंगची व्यवस्था आहे, त्या जागेवर हँगर लावून प्रदर्शन भरविण्यास परवानगी देण्यात येऊ नये, अशा सुचनाही महापालिकेला तसेच नेस्कोच्या व्यवस्थापनाला देण्यात आल्याचे कुमार यांनी यावेळी सांगितले. सह पोलिस आयुक्त (वाहतुक) यांनी केलेल्या सुचनांची दखल घेऊन महापालिकेने पुढील कायवाही करावी, अशी सुचना वायकर यांनी महापालिकेच्या अधिकार्‍यांना केली.

जनतेच्या मागणीनुसार जोगेश्‍वरी विक्रोळी लिंक रोडवरील अनधिकृत गॅरेजेस, कायमस्वरुपी काढून टाकण्यासाठी महापालिकेने कठोर पावले उचलावीत, सर्विस रोडवरील दुकाने हटविण्यात यावे, अशा सुचना वायकर यांनी के पुर्व विभागाचे सहाय्यक महापालिका आयुक्त जैन यांना दिले. त्याचबरोबर पश्‍चिम द्रुतगती मार्गावर ज्या ठिकाणी मेट्रोने अनावश्यक बेरीकेट लावले आहे, तसेच ज्या ठिकाणी पिलरचे काम पुर्ण झाले आहे. त्या ठिकाणचे बॅरिकेट्‌स तातडीने काढून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा. त्याचबरोबर पश्‍चिम द्रुतगती मार्गावरील उड्डाणपुलावर पडलेले खड्डे तातडीने बुजविण्यात यावे, अशी सुचना वायकर यांनी मेट्रोच्या तसेच एमएसआडीसीच्या अधिकार्‍यांना दिल्या.

मुसळधार पावसामुळे कोसळलेल्या आरेतील पुलामुळे येथील वाहतुक जोगेश्‍वरी विक्रोळी लिंक रोडवर वळविण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा ताण अधिक वाढला आहे. कोसळलेल्या पुलाच्या जागी महापालिकेतर्ङ्गे नविन पुल बांधण्याचे काम सुरू असून १५ जानेवारी २०१८ पर्यंत तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे आश्‍वासन पुल तयार करणार्‍या कंत्रादारांनी राज्यमंत्री वायकर यांना दिले.

Previous articleएकरी ३ क्विंटल कापूस निघतोय…कसं जगायचं…शेतकऱ्यांचा सवाल!
Next article१८ डिसेंबरला भुजबळांच्या जामीन अर्जाचा फैसला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here