मुंबई नगरी
नाशिक: जालन्यातील भाजपनेते रावसाहेब दानवे आणि पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे वैमनस्य माहीतच आहे.पण या वैमनस्याने कमाल पातळी गाठली असून खोतकर यांनी आज युती झाली तरी जालन्यातून मी लोकसभेला उभा राहणारच,असे वक्तव्य केले आहे.यामुळे भाजप शिवसेनेतील राजकीय वैर किती तीव्र झाले आहे,याची कल्पना येत आहे.
खोतकर यांनी आज नाशिकमध्ये सांगितले की,युती झाली तरी मी जालन्यातून उभा राहणारच आहे.मी रावसाहेब दानवे यांच्याविरोधात उभा राहून त्यांना पराभूत करणार आहे.भाजपची घमेंड आणि मस्ती मी उतरवणार आहे. भाजपने आम्हाला दिलेली वागणूक खूपच क्लेशदायक आहे,असे खोतकर म्हणाले.
खोतकर आणि दानवे यांच्यातील वैर पराकोटीला गेले आहे,याची चिन्हे पूर्वीही दिसली आहेत.भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी दानवे युती न झाल्यास दीड लाखांच्या फरकाने हरतील,असे भाकीत केले होते.तसे झाले नाही तर मी राजकीय संन्यास घेईन,असे ते म्हणाले होते.त्यावर खोतकर यांनी काकडे यांना राजकीय संन्यास घेण्याची वेळ येणार नाही,असे वक्तव्य केले होते.