प्रकाश आंबेडकर सोलापूरमधून लोकसभा लढवणार

प्रकाश आंबेडकर सोलापूरमधून लोकसभा लढवणार

मुंबई नगरी टीम

सोलापूर : माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यापुढे आता भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.आंबेडकर यांनी सोलापूरमधून निवडणुक लढवण्याचा विचार सुरू केला असल्याचे वृत्त आहे. तसे झाले तर आतापर्यंत सोपी वाटणारी निवडणूक शिंदे यांच्यासाठी खूपच अवघड होणार आहे. दलित आणि मुस्लिम ही काँग्रेसची परंपरागत व्होट बँक विभागली जाऊन कदाचित याचा फायदा भाजपला होऊ शकतो.

यासंदर्भात आंबेडकर म्हणाले की,मी सोलापुरातून निवडणूक लढवावी, अशी इच्छा बहुजन वंचित आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांची आहे.अकोल्यातील एका पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांनी ही माहिती दिली.परंतु निवडणूक खरोखर कुठून लढवणार याबाबतीत  आंबेडकरांनी काहीही स्पष्टपणे सांगितले नाही.पण प्रकाश आंबेडकर सोलापुरातून लढल्यास सुशीलकुमार शिंदे यांच्या अडचणीत चांगलीच वाढ होणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघ सध्या भाजपकडे असून शरद बनसोडे हे सोलापुरातून विद्यमान खासदार आहेत. बनसोडे यांनी मोदी लाटेत २०१४च्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांना पराभूत करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

अनेक दिवसांपासून काँग्रेस नेते आणि आंबेडकर यांच्यात आघाडीसंदर्भात बैठका सुरू आहे. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस आघाडीकडे २२ जागांची मागणी केली आहे. परंतु काँग्रेस आंबेडकरांना तेवढ्या जागा देण्यास तयार नाही. बहुजन वंचित आघाडीला २२जागा द्यायच्या, राजू शेट्टी यांना दोन जागा द्यायच्या, अन्य मित्रपक्षांना एक-दोन जागा दिल्यावर शिल्लक राहणाऱ्या दहा-बारा जागा आम्ही वाटून घ्यायच्या का, असा सवाल बैठकीत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केल्याचे समजते. ज्या जागा वंचित आघाडी मागत आहे, त्यात नांदेड, बारामती आणि माढा यांचा समावेश आहे.

आघाडीबाबत झालेल्या बैठकीत लक्ष्मण माने म्हणाले होते की, मसुदा काय असावा यावर चर्चा झाली आहे, मात्र अंतिम निर्णय व्हायचा आहे. राहुल गांधी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीत पुढील निर्णय होईल. आम्ही २२ जागांवर उमेदवार जाहीर केले असूनत्या  जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत, अशी आमची भूमिका आहे.आंबेडकर आणि काँग्रेस यांच्यात आता कुणीतरी एकाने माघार घेतल्याशिवाय तोडगा निघणे शक्य नाही. सुशीलकुमार शिंदे यांना मात्र आंबेडकर यांच्या प्रवेशामुळे निवडणूक सोपी राहिलेली नाही. सोलापूरमध्ये दलित मतदार मोठ्या संख्येने आहेत. आणि स्वतः शिंदे दलित आहेत. पण आंबेडकर यांच्या रूपाने त्यांना आणखी एका तगड्या दलित उमेदवाराचा सामना करावा लागू शकतो.

 

Previous articleशरद पवार यांची माढ्यातुन माघार; मावळमधून पार्थ पवार
Next articleसुजय विखे यांच्या नावाच्या चर्चेमुळे दिलीप गांधी गट संतप्त