येत्या ७ जूनला विधानपरिषदेची पोटनिवडणूक

येत्या ७ जूनला विधानपरिषदेची पोटनिवडणूक

मुंबई नगरी टीम

मुंबई : विधानपरिषदेचे माजी सभापती व काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य शिवाजीराव देशमुख यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी येत्या ७ जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी येत्या ७ जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे.विधानसभा सदस्यातून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या पोटनिवडणूकीत विधानसभेतील भाजप आणि शिवसेनेचे संख्याबळ पाहता भाजपचा उमेदवार सहज विजयी होवू शकतो.या पोटनिवडणूकीसाठी येत्या २१ मे रोजी अधिसूचना जारी करण्यात येईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा २८ मे हा शेवटचा दिवस असून, ७ जून रोजी मतदान घेण्यात येणार आहे. विधानसभेतील युतीचे संख्याबळ पाहता ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत भद्रावतीचे शिवसेनेचे आमदार सुरेश धानोरकर यांनी शिवसेनेचा आणि आमदारकीचा राजीनामा देवून कॅांग्रेसकडून निवडणूक लढवली आहे. तर कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी  शिवसेनेचा आणि आमदारकीचा राजीनामा देत अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवली आहे. शिवसेनेचे नांदेडचे आमदार प्रताप पाटील यांनी शिवसेनेचा राजीनामा देत भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवली. धुळ्याचे भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी भाजपाचा राजीनामा देत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे. या चौघांचे आमदारकीचे राजीनामे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मंजूर केल्याने शिवसेना भाजपाची सदस्य संख्या घटली आहे. काटोलचे भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी यापूर्वीच भाजपाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. माळशिरसचे राष्ट्रवादीचे आमदार हणुमंत डोळस यांचे निधन झाल्याने विधानसभेत एकूण सहा जागा रिक्त आहेत.निवडणूकीदरम्यान मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांनी मनसेचा त्याग करीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.सिल्लोडचे कॅांग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांना पक्षातून काढण्यात आले आहे.

सध्या विधानसभेत भाजप १२१,( अनिल गोटे यांचा राजीनामा) शिवसेना ६० ( सुरेश धानोरकर, हर्षवर्धन जाधव, प्रताप पाटील यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला आहे. सेनेला शरद सोनवणे यांचा पाठिंबा मिळू शकतो ), कॅांग्रेस ४२ , राष्ट्रवादी ४० ( हणमंत डोळस यांचे निधन ), बहुजन विकास आघाडी ३, शेकाप ३, एम आय एम २, भारीपा बहुजन महासंघ १, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीया १, रासपा १, समाजवादी पार्टी १, अपक्ष ७ असे संख्याबळ आहे. माजी सभापती शिनाजीराव देशमुख यांची मुदत २४ एप्रिल २०२० पर्यंत असल्याने निवडून येणा-या सदस्याला केवळ ११ महिन्याचा कार्यकाळ मिळणार असल्याने आणि युतीचे संख्याबळ जास्त असल्याने विरोधक या पोटनिवडणूकीत उमेदवार देण्याची शक्यता कमी असल्याने ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Previous articleमुख्यमंत्र्यांचा ६ दिवसांत २७ हजार लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांशी संवाद
Next articleगुलाल उधळायला बारामतीला जाणार