आमदार उदय सामंत ठरले “किंगमेकर”
मुंबई नगरी टीम
रत्नागिरी : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदूर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.खा. राऊत यांच्या विजयात रत्नागिरीचे आमदार आणि म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी मोलाचा वाटा उचलला असून, विनायक राऊत यांना रत्नागिरीतून ५९ हजार ५५९ मताधिक्य मिळवून दिले तर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून विक्रमी १ लाख २ हजार मतांची राजकीय ताकद दिली असल्याचे निकालाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांच्यात झालेल्या सिंधुदूर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. या निवडणूकीत शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी बाजी मारत १ लाख ७८ हजार मतांनी विजय मिळवला. राऊत यांना ४ लाख ५८ हजार २२ तर निलेश राणे यांना २ लाख ७९ हजार ७०० मते मिळाली.रत्नागिरी जिल्ह्यावर या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचे गणित अवलंबून होते. रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून शिवसेना उमेदवार विनायक राऊत यांना ५९ हजार ५५९ मताधिक्य मिळाले आहे तर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून विक्रमी १ लाख २ हजार मते राऊत यांच्या पारड्यात मतदारांनी टाकली आहे. मात्र यांचे सर्व श्रेय रत्नागिरीचे आमदार आणि म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांना जात आहे. आ. सामंत यांनी पक्ष संघटनेच्या बळावर हे यश मिळवले आहे.
प्रचारा दरम्यान विरोधकांच्या आव्हानाला सामोरे जात आ. सामंत यांनी त्यांना धोबीपछाड दिली असल्याची चर्चा मतदार संघात आहे. आ. सामंत यांनी निवडणुकीची प्रचार यंत्रणा योग्य रितीने हाताळून रत्नागिरीतून ५० हजाराच्यावर मताघिक्य मिळवून देण्याच निर्घार केला होता. राऊत यांना मिळालेल्या विक्रमी मताधिक्यापैकी एक तृतीयांशहून अधिक मताधिक्य केवळ रत्नागिरीत मिळाल्याने त्याचे श्रेय हे आ. सामंत यांना जाते.त्यामुळे या मतदार संघात आ. उदय सामंत हेच किंगमेकर असल्याचे बोलले जाते. माझ्या राजकीय जीवनात रत्नागिरीतील जनतेने मला भरभरून दिले. मला तीन वेळा आमदार केले, मंत्री केले, अंदाज समिती चेअरमन केले, म्हाडाच्या अध्यक्षपदावर संधी दिली. आणि कालच्या निकालात रत्नागिरी मतदारसंघातून विक्रमी १ लाख २ हजार मते देऊन मला राजकीय ताकद दिली. त्या बद्दल माझ्या मतदारांचे जेवढे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. म्हणूनच कर्तव्य भावनेतुन मी मतदारांचे ऋण फेडण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत रत्नागिरीकरांची सेवा करणार. अशी भावना म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केली.