विखेंना मंत्रीपद देणे योग्य आहे का ? : अजितदादांचा सवाल

विखेंना मंत्रीपद देणे योग्य आहे का ? : अजितदादांचा सवाल

मुंबई नगरी टीम

मुंबई :  राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी माजी विरोधी पक्ष नेते आणि कालच मंत्रीपदाची शपथ घेतलेले राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना लक्ष्य केले.  विखे पाटील यांचे विधानभवनात आगमन होताच विरोधकांनी घोषणाबाजी करीत त्यांचे स्वागत केले तर विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर  त्यांना मंत्रिपद कसे काय दिले जाऊ शकते ? एखाद्या पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्यावर मंत्रीपद देणे योग्य आहे का? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सभागृहात केला.

सभागृहाच्या कामकाजाला सुरूवात होण्यापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी पक्षांचे सदस्यांनी आज विधानभवनाच्या पाय-यावर जोरदार घोषणाबाजी केली.गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे विधानभवनात आगमन होताच विरोधकांनी “आयाराम गयाराम”  “जय श्रीराम” अशा घोषणांनी त्यांचे स्वागत केले. विकासाची सगळी स्वप्ने भंग, मुख्यमंत्री मंत्रिमंडळ विस्तारात दंग अशा जोरदार घोषणा देत विरोधकांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन होतानाच विरोधी पक्षांतील सदस्यांनी “आले रे आले चोरटे आले” अशी  घोषणाबाजी केली.सरकाराची सगळी स्वप्ने भंग, सरकार मात्र विस्तारात दंग, जय श्रीराम आयाराम गयाराम असे फलक विरोधकांनी फडकावले. तर सभागृहाचे कामकाज सुरू होताच विखे-पाटील यांच्या मंत्रीपदाविषयी राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ नेते अजित पवार यांनी विधानसभेतही आक्षेप घेतला; मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विखे-पाटील यांची योग्य त्या प्रक्रियेप्रमाणेच निवड केली आहे, असे स्पष्ट केले.

 सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे  हे देखील विरोधी पक्षनेते झाले, त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना सत्ताधारी केले.  राधाकृष्ण विखे-पाटील विरोधी पक्षनेते होते. त्यांनाही तुम्ही आपल्या  पक्षात घेतले. आता काँग्रेसचे विजय वड्डेटीवार विरोधी पक्षनेते झाले आहेत, त्यांना निवडणूक होईपर्यंत पक्षात घेऊ नका असा उपरोधक टोला पवार यांनी लगावला.  राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांना मंत्रिपद कसे काय दिले जाऊ शकते ? एखाद्या पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर दुस-या पक्षात प्रवेश केल्यावर मंत्रीपद देणे योग्य आहे का ? असा सवाल पवार यांनी उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनीच उत्तर देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

Previous articleविखे पाटील यांना गृहनिर्माण तर ; सुरेश खाडेना सामाजिक न्याय
Next articleराज्याच्या दरडोई उत्पन्नात ८.९ टक्क्यांची वाढ अपेक्षित