मी दलित पँथरचा पँथर असल्याने “ पँथरलाच” दत्तक घेतले
मुंबई नगरी टीम
मुंबई : पर्यावरणाच्या रक्षणासाठी निसर्गावर वृक्षवल्लींवर आणि वन्यप्राण्यांवर प्रेम करा असा संदेश देण्यासाठी आपण बिबळ्या वाघ दत्तक घेतला आहे.बिबळ्या म्हणजे पँथर. पँथर कुणावरही अन्याय करीत नाही मात्र त्याच्यावर कोणी अन्याय केला तर तो सरळ नरडीचा घोट घेतो. मी स्वतः दलित पँथरचा पँथर असल्याने वन्यप्राणी दत्तक योजनेत पँथरलाच दत्तक घेतले असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
यावेळी त्यांनी दत्तक घेतलेल्या भीम पँथरचा ९ वा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी रामदास आठवले यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सीमाताई आठवले पुत्र जीत आठवले, बहीण शकुंतला आठवले उपविभागीय वन अधिकारी सचिन रेपाळ आयोजक दिलीप व्हावळे आदी मान्यवर उपस्थित होते. संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये बिबळ्या वाघांच्या पिंजऱ्या जवळ रामदास आठवले यांनी भेट देऊन दत्तक घेतलेल्या भीम पँथरची पाहणी केली. यावेळी जाळीच्या कडेने चालणाऱ्या पँथरला रामदास आठवले यांनी आवाज देऊन बस असे बोलताच भीम पँथर जाळी जवळ शांत बसला. हे पाहून उपस्थित आठवले कुटुंबीय रिपाइं कार्यकर्ते वन अधिकारी;पोलीस सर्व अचंबित आणि आनंदित झाले.
भीम पँथर या बिबळ्या वाघाला तीन वर्षांपूर्वी रामदास आठवले यांनी पुत्र जित आठवलेंच्या अग्रहास्तव दत्तक घेतले आहे. तेंव्हा पासून ते दरवर्षी या बिबळ्या वाघाच्या संभाळासाठी वन विभागाला १ लाख २० हजारची रक्कम अदा करीत असतात. वन्यप्राण्यांवर प्रेम करा;निसर्गावर प्रेम करा;झाडे लावा झाडे वाढवा ; पर्यावरणाचे रक्षण करावे असा संदेश देत नागरिकांनी वन्यप्राण्यांना दत्तक घेण्याचे आवाहन रामदास आठवलेंनी यावेळी केले.रामदास आठवले हे दलित पँथर मधून पुढे आलेले नेतृत्व. त्यांचा चाहता वर्ग आठवलेंवर पँथर म्हणून प्रेम करतो. त्यामुळे एक पँथर दुसऱ्या पँथर ला दत्तक घेतो हा सोहळा बघण्यासाठी रिपाइं कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.