मराठा आणि आर्थिक दुर्बल घटकातील विध्यार्थ्यांना मोठा दिलासा
मुंबई नगरी टीम
मुंबई : न्यायालयाने मराठा आरक्षण वैध ठरवल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी मराठा आणि आर्थिक दुर्बल घटकातील विध्यार्थ्यांना राज्य शासनाकडून मोठा दिलासा देण्यात आला असून, खुल्या प्रवर्गातून ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज केलेल्या मराठा आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना पुन्हा सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग आणि आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गामधून अर्ज करण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गाकरिता अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे या प्रवर्गाचे जातप्रमाणपत्र नसल्यास याबाबतचे पालकांचे हमीपत्र स्वीकारण्यात येणार. आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना देखील पालकांच्या हमीपत्रावर प्रवेश घेता येईल. तसेच या शैक्षणिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात येईल. अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी एका निवेदनाद्वारे विधानसभेत दिली.
शालेय शिक्षण मंत्री शेलार यांनी निवेदनात म्हटले आहे की, राज्यात इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद व अमरावती या महानगरपालिका क्षेत्रात सुरु करण्यात आली आहे. २०१९-२० मध्ये करावयाच्या इयत्ता ११ वी प्रवेशासंदर्भातील कार्यपद्धती शासन निर्णय दिनांक ७ मार्च २०१९ अन्वये विहित करण्यात आली आहे. सदर शासन निर्णयात इयत्ता ११ वी प्रवेशाकरिता सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग (एस.ई.बी.सी) करिता १६ टक्के व आर्थिक दुर्बल घटक (ई.डब्लू.एस.) या प्रवर्गाच्या आरक्षणाबाबतचा उल्लेख असून विद्यार्थ्यांना त्यानुसार मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.
उच्च न्यायालयाने सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गाकरिता आरक्षण वैद्य ठरविले असून सदर प्रवर्गाकरिता शिक्षणामध्ये १२ टक्के आरक्षण मंजूर केले आहे. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत एकूण नोंदणी केलेले अर्ज तपासले असता, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग (एस.ई.बी.सी) करिता आर्थिक दुर्बल घटक (ई.डब्लू.एस.) या प्रवर्गांकरिता क्षेत्रनिहाय राखीव जागा व प्राप्त अर्ज याबातची माहिती पुढील प्रमाणे आहे.सामाजिक न्याय व शैक्षणिक मागास प्रवर्ग (एस.ई.बी.सी) १२ टक्के प्रमाणे मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती अशा सर्व क्षेत्रात मिळून राखीव जागा ३४ हजार २५१ आहेत. त्यासाठी ४ हजार ५५७ अर्ज प्राप्त झाले आहेत. तर आर्थिक दुर्बल घटक (ई.डब्लू.एस.) १० टक्के प्रमाणे एकूण राखीव जागा २८ हजार ६३६ असून त्यासाठी २ हजार ६०० अर्ज प्राप्त आहेत. यावरुन असे दिसून येते की, विद्यार्थ्यांनी सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग (एस.ई.बी.सी) करिता आर्थिक दुर्बल घटक (ई.डब्लू.एस.) या प्रवर्गाची निवड केलेली नसून या विद्यार्थ्यांनी सर्वसाधारण प्रवर्गातून अर्ज भरलेले असावेत.
तथापि सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग (एस.ई.बी.सी) करिता आर्थिक दुर्बल घटक (ई.डब्लू.एस.) याकरिता अनुक्रमे १२ टक्के व १० टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत. तथापि या विद्यार्थ्यांनी जर सदर प्रवर्ग निवडले नाही तर, प्रथम फेरीत हे सर्व विद्यार्थी सर्वसाधारण प्रवर्गामध्ये गृहीत धरले जातील. यामुळे सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग (एस.ई.बी.सी) करिता आर्थिक दुर्बल घटक (ई.डब्लू.एस.) या प्रवर्गाच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग आणि आर्थिक दुर्बल घटक या प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये या हेतूने सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग आणि आर्थिक दुर्बल घटक या प्रवर्गात मोडणाऱ्या विद्यार्थ्यांनी सर्वसाधारण प्रवर्गातून अर्ज भरले आहेत, तथापि आता त्यांना आरक्षणाचा लाभ घेण्याची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांना त्यांचा प्रवर्ग बदलण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्रे व शाळांमध्ये आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येतील.उच्च न्यायालयाने एस.ई.बी.सी आरक्षणासंदर्भात दिलेल्या आदेशानुसार एस.ई.बी.सी संवर्गास १६ टक्के ऐवजी १२ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात येतील. त्यानुसार प्रवेशाकरिता सीट मॅट्रिक्समध्ये आवश्यक बदल करण्याकरिता तसेच एस.ई.बी.सी व ई.डब्लू.एस. प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भाग १ व भाग २ सुधारित करण्याकरिता विशेष कालावधी देण्यात येत असून, प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहे.
आय.सी.एस.ई विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेमध्ये ६ विषयांच्या गुणासंदर्भात दि.१९ जून, २०१९ च्या पत्रानुसार आय.सी.एस.ई मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत गुणपत्रिकेवर सरासरी गुण दर्शविण्यात आले आहेत. सदर सरासरी ग्राहय धरण्यात येतील. गुणपत्रिकेवर एकूण 6 विषयांचे सरासरी गुण दर्शविण्यात आले आहेत. या पैकी पहिल्या ५ विषयांचे सरासरी गुण इयत्ता ११ वी प्रवेशाकरिता ग्राह्य धरण्यात येतील.सदर आदेश हे ६०० गुणांपैकी (सहा विषय घेवून) परिक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देण्यात आले होते. सहा विषय प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनी ग्रुप १ मधील तीन विषय व ग्रुप २ मधील दोन विषय व ग्रुप ३ मधील एक विषय असे विषय घेतलेले आहेत. गुणपत्रिकेमधील क्रमांक सहा मध्ये दर्शविण्यात आलेले विषय हे बहुतांशी ग्रुप ३ मधील आहेत. त्यामुळे पहिल्या पाच विषयांचे सरासरी गुण ग्राहय धरण्याबाबत कळविण्यात आले होते. ग्रुप ३ मधील विषय हा बेस्ट फाइव्हसाठी धरला जाऊ शकत नाही. याअनुषंगाने स्प्ष्ट करण्यात येते की सहा विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांचे ग्रुप १ मधील व ग्रुप २ मधीलच पाच विषयांचे गुण इयत्ता ११ वी प्रवेशासाठी ग्राहय धरले जातील.
तथापि आय.सी.एस.ई मंडळातर्फे ७०० गुणांपैकी साम विषय घेऊन देखील परिक्षेस प्रविष्ट झाल्याचे निर्दशनास आले आहे. हे विद्यार्थी ग्रुप १ मधील तीन ३ विषय व ग्रुप ३ मधील १ विषय प्रविष्ट झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश विचारात घेता या विद्यार्थ्यांना पुढीलप्रमाणे पर्याय उपलब्ध राहतील. ग्रुप १, २ मधील सहा विषयांपैकी कोणतेही पाच विषयांचे बेस्ट फाइव्ह गुण ग्राहय धरण्यात येतील. किंवा (ब) ग्रुप १ , २ व ग्रुप ३ मधील सात विषयांपैकी ७०० ग्रुणांची सरासरी ग्राह्य धरण्यात येईल. तरी या अनुषंगाने संबंधित आय.सी.एस.ई विर्थ्यांना भाग १ व भाग २ मध्ये आवश्यक सुधारणा करण्याकरिता नजीकची शाळा अथवा मार्गदर्शन केंद्राशी संपर्क करण्याच्या आवश्यक सूचना सर्व आय.सी.एस.ई शाळांना देण्यात येत आहेत. दि.२८ जून, २९ जून व १ जुलै २०१९ रोजी या विद्यार्थ्यांनी भाग १ व २ मध्ये आवश्यक सुधारणा करुन घ्याव्यात, असे निवेदनात म्हटले आहे.