आचारसंहितेच्या धसक्याने मंत्रालय “हाऊसफुल्ल”
मुंबई नगरी टीम
मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यास जेमतेम वीस दिवसाचा अवधी शिल्लक असतानाच आचारसंहितेच्या धसक्यामुळे गेल्या काही दिवसापासुन मंत्रालय अभ्यागतांमुळे हाऊसफुल्ल होत आहे. सरकार दरबारी आपली कामे हातावेगळी करण्यासाठी राज्याच्या विविध भागातुन राजकीय कार्यकर्त्यांसह हजारो अभ्यांगतामुळे मंत्रालयातील सर्व मजले आणि मंत्र्यांची दालने गजबजली असल्याचे चित्र आहे.
वेगवेगळ्या पक्षांच्या राज्यात सध्या सुरू असलेल्या यात्रा आणि आमदारांचे पक्षांतर यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे सध्या राज्यात वाहू लागले असतानाच सरकार दरबारी रखडलेली कामे उरकुन घेण्यासाठी राज्यातील ग्रामिण भागातील जनता राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात धावताना दिसत आहे.मंत्रालयात यापुर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकी दिवशी म्हणजेच दर मंगळवारी दिसणारी गर्दी आता गेल्या काही दिवसापासुन प्रत्येक दिवशी दिसत आहे.काल मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकी दिवशी मंत्रालयातील गर्दीचे रेकॅार्ड मोडले गेले. काल सकाळपासूनच मंत्रालयाच्या मुख्य दरवाजा,गार्डन गेट आणि आरसा गेटवर प्रवेश पत्रिकेसाठी राज्यातील विविध भागातुन आलेल्या अभ्यागतांनी एकच गर्दी केल्याचे चित्र होते.मंत्रालयातील कर्मचारी अधिकारी वगळता अभ्यागतांना दुपारी दोन नंतर मंत्रालयात प्रवेश दिला जातो मात्र काल आणि आज सकाळपासुन मंत्रालयाच्या तिन्हीही प्रवेशद्वारावर पास घेण्यासाठी अभ्यागतांची झुंबड उडाल्याचे चित्र होते.काल मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात किमान दहा हजार अभ्यागतांनी प्रवेश केल्याचे सूत्रांकडून समजते.
मंत्रालयात प्रवेश पत्रिका घेण्यासाठी अभ्यागतांच्या सोईसाठी तिन्ही प्रवेद्वारावर पासासाठी खिडक्यांची सोय करण्यात आली आहे.या ठिकाणी पास देण्यासाठी महाऑनलाईन हि संस्था कार्यरत होती मात्र या संस्थेचा करार संपल्याने सुमित हि संस्था गेल्या आठवड्यापासुन कार्यरत आहे.सुमित हि संस्था नवी असल्याने अभ्यागतांना पास देण्यास विलंब होत असल्याचे गा-हाणे काहींनी मांडले.तर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आचारसंहितेच्या धसक्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मंत्रालयात रखडलेली कामे मार्गी लागण्यासाठी कालपासुन झुंबड उडाली होती.मंत्रालयात प्रवेशाचा पास काढण्यासाठी सकाळपासून रांगा लागल्या होत्या. या रांगा पाच वाचले तरी वाढत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसापासुन आहे.जेवढी गर्दी मंत्रालयाच्या बाहेर आहे तेवढीच गर्दी मंत्रालयाच्या सर्व मजल्यावर पाहवयास मिळत आहे.अभ्यागतांच्या गर्दीमुळे काल आणि आज मंत्र्यांची दालनेही या गर्दीने फुलून गेली आहेत.अभ्यागतांच्या गर्दी बरोबरच मंत्रालयाचा परिसर वाहनांनी फुलून गेल्याने मंत्रालय परिसरात वाहतुक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे.आमदार आणि व्हीआयपी व्यक्तीसाच्या वाहनांसाठी मंत्रालय प्रवेशासाठी विशिष्ट पास वितरित केले जातात.अशा वाहनांच्या पार्किंगसाठी काल आणि आज जागा उपलब्ध नव्हती.