दुस-यांदा स्थगित करावी लागली महाजनादेश यात्रा
मुंबई नगरी टीम
मुंबई : कोल्हापूर सांगलीसह साता-यात आलेल्या पूरानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दुस-यांदा आपली महाजनादेश यात्रा स्थगित करावी लागली. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रेचे रविवारचे कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहे. आज मुख्यमंत्री यात्रेसाठी मूळ कार्यक्रमानुसार ठिकठिकाणी जमलेल्या लोकांना भेटले पण कोणतीही भाषणे केली नाहीत किंवा हार स्वीकारले नाहीत, असे यात्राप्रमुख प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांनी सांगितले.
अरुण जेटली यांच्या निधनाचे वृत्त आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अरुण जेटली यांना श्रद्धांजली अर्पण करून यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केवळ लोकांना भेटले.यात्रेदरम्यान कोठेही स्वागताचे कार्यक्रम झाले नाहीत तसेच हारफुले स्वीकारण्यात आले नाहीत. महाजनादेश यात्रा रविवारी पूर्णपणे स्थगित करण्यात आली आहे. सोमवारी मूळ कार्यक्रमानुसार पाथर्डी येथून यात्रा पुढे जाईल असे आ. ठाकूर यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांची ही महाजनादेश यात्रा दुस-यांदा स्थगित करावी लागली. यापूर्वी कोल्हापूर, सांगलीसह साता-यात आलेल्या पूरानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यात्रा स्थगित करावी लागली होती.