राजू शेट्टींना धक्का ; रविकांत तुपकरांचा राजीनामा
मुंबई नगरी टीम
मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने माजी खासदार राजू शेट्टी यांना मोठा धक्का बसला आहे. रविकांत तुपकर हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांचे खंदे समर्थक आणि प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा राजू शेट्टी यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे स्वाभिमान शेतकरी संघटनेनेला विदर्भात मोठा धक्का बसला आहे. सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानीपासून काडीमोड घेतल्यानंतर तुपकर यांचे पक्षात वजन वाढले होते.मी अनेक वर्षापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये एक सक्रीय कार्यकर्ता होतो. माझ्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. परंतु आज मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे.त्यांनी राजीनाम्यात नाराजीचे कारण स्पष्ट केले नसले तरी ते लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.