कोकण विद्यापीठाच्या उपकेंद्राचा प्रस्ताव तातडीने पाठवा : उदय सामंत

कोकण विद्यापीठाच्या उपकेंद्राचा प्रस्ताव तातडीने पाठवा : उदय सामंत

मुंबई नगरी टीम

मुंबई : मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी विद्यापीठाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा.तसेच विद्यापीठाने शासनाशी समन्वय ठेवावा,शासन विद्यापीठांचा विकास आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करेल.मुंबई विद्यापीठावरील प्रशासकीय ताण आणि विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी होण्यासाठी रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पालघर, ठाणे, कल्याण या ठिकाणी जिथे कमी वेळेत उपकेंद्र सुरु होऊ शकते,त्याचा प्रस्ताव तातडीने पाठवावा, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे दिल्या.

मुंबई विद्यापीठात विद्यापीठातील सोयी-सुविधा आणि अडचणीसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. मुंबई विद्यापीठावरील प्रशासकीय ताण कमी करण्यासाठी उपकेंद्र सुरु करणे गरजेचे आहे. त्यासाठी रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पालघर, ठाणे, कल्याण यापैकी जेथे विद्यापीठाची जागा अधिक असून बांधकाम तयार आहे, कमी कालावधीमध्ये जिथे उपकेंद्र सुरु होऊ शकते त्याचा प्रस्ताव तातडीने तयार करावा. आणि यासाठी संचालक आणि समन्वयकाची नेमणूक करुन उपकेंद्र सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठाच्या इमारत दुरुस्ती आणि विद्यार्थ्यांना गुणवत्ता सुधारण्यासाठी लागणारा निधी सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून उपलब्ध करता येईल का याबाबत विचार करावा. तसेच विद्यार्थ्यांना रोजगार निर्मितीसाठी औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात यावे, व्हर्च्युअल क्लास रुम तयार करुन प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचे प्रशिक्षण सुरु करावे. कोकण विभागात पर्यटन, मत्स्यव्यवसाय, खाद्यपदार्थ प्रक्रिया उद्योग, फलोत्पादन यासारख्या रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असलेल्या विषयांचे विद्यापीठांनी अभ्यासक्रम तयार करावेत. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असेही सामंत यांनी सांगितले.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठाने रोस्टर तपासून प्राध्यापकांची रिक्त पदभरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. तसेच नवीन परीक्षा भवनाच्या इमारतीचा ताबा घेण्यासाठी कार्यवाही करावी. लवकरच मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथे याबाबत पुन्हा आढावा घेण्यात येईल.राज्यातील सर्व विद्यापीठानी आढावा बैठक घेऊन अहवाल सादर करावा आणि ज्या ठिकाणी विद्यापीठाच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे त्यावर कारवाई सुरु करावी, अशा सूचनाही सामंत यांनी केल्या.

Previous article“पत” नसेल तर पद काय कामाचे : प्रविण दरेकर
Next articleमाळीणच्या धर्तीवर तिवरे धरणबाधितांचे पुनर्वसन : उदय सामंत