मुंबई नगरी टीम
मुंबई : येत्या २२ जून पासून सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन राज्यात असलेल्या कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आले असून,आता हे अधिवेशन ३ ऑगस्ट पासून घेण्याचा निर्णय आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कोरोनामुळे आटोपते घ्यावे लागले होते.मात्र गेल्या तीन महिन्यांपासून राज्यावर असलेल्या कोरोना विषाणुच्या संकटामुळे येत्या २२ जून पासून सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ही पुढे ढकलावे लागले आहे.पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विधानभवनात झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठक पार पडली. राज्यातील आणि विशेषतः मुंबईतील कोरोना विषाणूंच्या संकटात हे अधिवेशन घेणे योग्य नसल्याचे एकमत झाल्याने आता पावसाळी अधिवेशन ३ ऑगस्ट पासून घेण्याचा निर्णय घेतला आहे.या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली. दरम्यानच्या काळात आवश्यकता भासल्यास ३ ऑगस्टपूर्वी पुरवणी मागण्यासांठी एका दिवसाचे विशेष अधिवेशन घेण्याची गरज निर्माण झाल्यास वित्त विभागाकडून यासंदर्भातील माहिती घेऊन त्यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्य आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते.कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत पावसाळी अधिवेशनाबाबत सर्वांनी एकमताने निर्णय घेऊन ३ ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.