मुंबई नगरी टीम
मुंबई : बकरी ईदच्या दिवशी नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये तसेच नमाज मस्जिद,ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता,आपल्या घरीच अदा करावी.अशा स्पष्ट सूचना गृहविभागाने दिल्या आहे.कोरोनामुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी बकरी ईद साजरी करण्यासंदर्भात गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.त्याचे पालन सर्व संबंधितांनी करावे, असे आवाहन गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.
राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे सर्वच सण अत्यंत साधेपणाने घरात बसून साजरे करण्यात आले आहेत.त्यानुसार बकरी ईदनिमित्त गृह विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.बकरी ईदची नमाज मस्जिद,ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे सध्या सुरू असणारे जनावरांचे बाजार बंद राहणार असल्याने मुस्लिम बांधवांनी जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावी. शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी.प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहणार असल्याने त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही असेही गृहविभागाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
बकरी ईदच्या दिवशी नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये.कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.